कर्ममार्गात व्रत वैकल्य नैमित्तिक पूजा अर्चा शुचिर्भूतता सांगितली आहे. शेगांवच्या श्री गजानन महाराजांना भेटायला आलेले श्री वासूदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी हे कर्ममार्गी सत्पुरूष. तर स्वामी गजानन परमहंस संन्यासी. एक कर्माचा सागर एक योगयोगेश्वर एक मोगरा सुंदर एक तरू गुलाबाचा. कर्माचा मार्ग तसा कठीण. कारण काटेकोरपणे नियम पाळणे होय. योगमार्ग त्याहून कठीण. या मार्गात तर योग साधना जमली पाहिजे. मात्र भक्तीमार्ग त्याहून सोपा. फक्त श्रींचे नामस्मरण करणे होय. जळी,स्थळी, काष्टी,पाषाणी चराचरात नाम सामावले आहे. गुरूचरित्र ग्रंथाच्या पहिल्याच पानावर लिहीले आहे. मन असता पवित्र सदासर्वकाळ वाचावे गुरूचरित्र. नामस्मरणाचेही अगदी असेच आहे. गजानन महाराजांनी म्हटलंय, मुखामाजी नामस्मरण करणे हरीस जाणून ऐंशी अंगे असती जाण या भक्तीमार्गाला. या अंगासह जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी भक्तीमार्गाची न ये सरी त्याचा विधी सोपा असे. आपण एवढेच करूयात, श्रींचे नामस्मरण करूयात. कर्ममार्ग, योगमार्ग, भक्तीमार्ग यांचे विषयीची किमान प्राथमिक माहिती तरी होईल. आपल्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडू लागतील. आत्मिक आनंद समाधान लाभेल. चला तर मग रोजचा संकल्प करूपात, एक तरी जपमाळ स्वामी गजाननाच्या नामाने जपूयात. म्हणूयात, श्री गजानन जय गजानन, गणी गण गणांत बोते, श्रीराम जयराम जय जय राम, जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com