भक्तांना आलेले अनुभव- अरुण हळबे,(टिळकवाडी, यवतमाळ, विदर्भ.)

भक्तांना आलेले अनुभव
अरुण हळबे,(टिळकवाडी, यवतमाळ, विदर्भ.)

अरुण हळबे हे यवतमाळ येथे एक मान्यवर शिक्षक म्हणून मशहूर आहेत. त्यांचे वडील अनंत परशुराम हळबे हे गजाननमहाराजांचे उपासक होते. १९६१ साली वयाच्या ६९ व्या वर्षी ते कालवश झाले. १९०७ साली वयाच्या पंधराव्या वर्षी विद्यार्थिदशेत असतानाच प्रथम ते शेगावला गेले. अगदी सकाळी स्नान उरकून ते त्यांच्या दोन मित्रांबरोबर महाराजांच्या मठात गेले. महाराज उठून बसलेले होते. अवतीभोवती भक्तगण होता महाराजांना चिलीम भरुन देणं, प्रसाद म्हणून पेढे-नारळ देणं सुरु होतं. एकानं तर शाल आणली होती. आपण काय द्यावं, हे या विद्यार्थांना कळेना. विद्यार्थ्यांजवळ पैसे कुठून असणार ? खिशात पाचसहा पैशापेक्षा जास्त पैसे नव्हते. एकदम ते तिघे विद्यार्थी बाहेर गेले. दोन पैशाचं दूध विकत घेतलं व पुन्हा मठात आले गर्दी वाढत चालली होती. मुलं पुढे जायला घाबरली होती. कारण दर्शनाला समोर गेलेल्या कांही लोकांना महाराजांनी मारताना त्यांना पाहिलं होतं.

     एवढ्यात महाराज आपल्या एका शिष्याला म्हणाले, “अमरावतीहून आलेली पोरं घाबरुन मागे बसलेली आहेत. त्यांना बोलवा पुढे…!” मुलं जवळ येताच त्या तिघांनाही जवळ बसवून घेतलं आणि लोटीत आणलेलं दूध तीर्थासारख स्वत: घेऊन त्या तिघांच्याही तोंडात स्वहस्ते घातलं; आणि त्या मुलांना महाराज म्हणतात कसे, “कशाला घाबरत होता इतके ? मी काय तुम्हाला मारणार आहे ?” महाराजांना नमस्कार करायचीही त्या विद्यार्थ्यांना आठवण राहिली नाही. बर्‍याच वेळानं महाराजांसमोर त्या तिघांनी डोक ठेवलं तेंव्हा त्यांनी मुलांच्या पाठीवरुन हात फिरवला.

     हे विद्यार्थी बाहेर पडताच पाचपंचवीस लोक त्यांच्यामागे लागले. लोटत शिल्लक राहिलेलं दूध त्यांना तीर्थ म्हणून हवं होतं.

     विद्यार्थीदशेत झालेली ही पहिली भेट अनंतराव हळबे यांना नेहमी स्मरायची. त्याचप्रमाणे महाराजांचं शेवटचं दर्शनही त्यांना नेहमी आठवायचं. महाराज समाधिस्त होण्यापूर्वी तीनचार महिणे त्यांना हे दर्शन घडलं. त्यावेळी ते एकटेच महाराजांच्या दर्शनाला गेले होते. महाराजांनी जवळ जवळ दीड तास त्यांना पलंगावर आपल्याजवळ बसवलं होतं. शेवटी मठाच्या दारापर्यंत स्वत: महाराज अनंतरावांना पोचवायला आले. दाराच्या चौकटीच्या उभ्या लाकडावर हात ठेवून ते एकटक पाहत होते. एकदोन वाक्यांत महाराजांनी अनंतरावांना गतजन्माचं रहस्य सांगितलं आणि भविष्यासंबंधीही सांगितलं. हि घटना अनंतरावांच्या अठराव्या वर्षी घडली. पुढे ते आणखी एकावन्न वर्ष जगले. पण त्यांनी आपली पत्रिका कुणाला कधी दाखवली नाही. ते नेहमी म्हणत, “एका त्रिकालज्ञाने भविष्य कथन केल्यावर आता इतर कुणाला काय विचारायचं ?” महाराजांनी केलेल्या भविष्याचा त्यांना वारंवार पडताळा आलेला आहे.

     अनंतराव हळबे जसजसे वृद्धत्वाकडे झेपावू लागले, तसं तसं त्यांचं मन अधिकाधिक हळुवार व्हायला लागलं. सेवानिवृत्तीनंतर त्यांना देवादिकांच्या कार्याकडे लक्ष द्यायला अधिक वेळ मिळू लागला. त्यांना नेहमी वाटायचं की , आपल्याजवळ गजाननमहाराजांचा एखादा फोटो असायला हवा. एके दिवशी ते त्यांचे पुतणे रा. शं. हळबे यांना म्हणाले, “अरे रामू , एकदा गजाननमहाराजांचं पोर्टेट तयार करा की !” पण कार्यबाहुल्यामुळे पुतण्याच्या हातून चित्र काही तयार झालं नाही… त्यांच्या मनात हाच विचार चालला होता. दुपारची वेळ होती. जेवण उरकलेलं होतं. त्यांच्या हातात वर्तमानपत्र होतं. महाराजांचं चित्र मिळालं नाही याची खंत त्यांच्या मनात होती. ते स्वत: चांगली चित्रं काढत असतं. पण आता वय झाल्यामुळे ते शक्य नव्हतं. आपल्याला महाराजांचं चित्र तयार करता येणार नाही, या विचारानं त्यांच मन खिन्न झालं. डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. त्यांनी पुन्हा तोंडासमोर वर्तमानपत्र धरलं. वाचता वाचताच त्यांना डुलकी लागली. ते आरामखुर्चीत बसलेले होते. बसूनच नेहमीप्रमाणे डुलकी घेत होते. दुपारची वेळ होती. इतक्यात कांहीतरी वाजल्याचा भास झाला. त्यांना जाग आली. त्यांना एवढाच भास झाला की, फाटकातून कुणीतर बाहेर पडलं आहे.वेळ पोस्टमन येण्याची होती. म्हणून ते उठले आणि घरात पत्र पडलं आहे की काय ते बघितलं. पुठ्ठ्याची एक पुंगळी दिसली. बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेटचं कॅलेंडर नेहमी अशाच पुंगळीतून यायचं. म्हणून आत काय आहे ते पाहिलं. आत गजाननमहाराजांचं छापील चित्र दिसलं.

     ते बघताच अनंतरावांचा आनंद गगणात मावेनासा झाला. एकदा आनंद ओसरल्यावर त्यांनी ती पुंगळी हातात घेऊन त्यावरील छाप वाचण्याचा प्रयत्न केला. यवतमाळचा छाप दिसत होता, पण जिथून ती पुंगळी पाठवली गेली त्या ठिकाणचा पोस्टाचा शिक्का वाचता येत नव्हता. सुरवातीला त्यांना वाटलं की, आपल्या पुतण्यानं हे चित्र पाठवलं असावं म्हणून त्याचं कौतुक करणारं एक पत्र त्याला लिहिलं. मी चित्र पाठवलेलं नाही, असं पुतण्याचं उत्तर आलं. मग त्यांना वाटलं शेगावच्या आपल्या मित्रांनी हे चित्र पाठवलं असावं. त्यांना जोडकार्ड पाठवून त्यांचेही आभार मानले. त्या मित्रांनी उत्तर पाठवून कळवलं, महाराजांची चित्रं छापून तयार झालेली नाहीत. छापून आल्यावर विक्रीस तयार होतील.वेगवेगळ्या आकाराच्या चित्रांचे दरही त्यांनी कळविले होते. ज्या आकाराच चित्र पुंगळीतून आलेलं होतं, त्याची किंमत दहा आणे राहील असंही त्यांनी कळवलं होतं…. त्यानंतर अनंतरावांनी खूप ठिकाणी पत्रं पाठवून चित्र कुणी पाठवलं याची चौकशी केली होती. पण अखेरपर्यंत ते गूढच राहिले. चित्रं छापून व्हायची आहेत असं मठाच्या व्यवस्थापकांनीही कळवलं होतं.

     अनंतरावचे सुपुत्र अरुण हळबे अभिमानानं आणि श्रद्धायुक्त अंत:करणानं सांगतात, “आज पंचवीस वर्षं तरी आमच्या देवघरात देवाच्या गाभार्‍यात ते चित्र लावलेलं आहे. माझ्या वडिलांनी तो प्रसाद मानला होता. वडिलांना मिळालेला प्रसाद आज आमचा आशीर्वाद ठरतो आहे. तीच आमची श्रीमंती आहे. तोच ठेवा आहे. वैभवही तेच आहे.
श्री गजानन महाराजांचा एक भक्त

अरुण हळबे

टिळकवाडी, यवतमाळ, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.