“श्री”
गजानन महाराजकी जय (अनुभव71🌺)
*’गण गण गणांत बोते’ म्हणूनी लावा अंगारा*
जय गजानन! आपण गजानन महाराज भक्त!महाराजांची भक्ती करतो!कधी कधी अडचण आली की ती सांगायला त्यांच्या समोर बसतो.कधी काही मार्ग निघाला की आनंदीत होतो,मार्ग न मिळाला तर हताश होतो. पुन्हा महाराजांना प्रार्थना करतो. कधी कधी सुप्त मनातून अचानक काही सुचतं आणि तो उपाय काम करून जातो. कुणी म्हणतात या वातावरणात एक सुप्त शक्ती आहे ती तुम्हाला सहाय्य करते!खरंच!पण माझ्यापुरतं बोलायचं तर माझ्यासाठी त्या शक्तीचं नाव आहे..”समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज “.
मला माझ्या दोन्ही मुलींच्या बाबतीत थोडाफार असा अनुभव आला.आता पुढे काही सांगायच्या आधी मी माझी थोडक्यात ओळख करून देते. मी आशा भाऊराव इटनकर. लोकसेवा हायस्कूल नवरगाव येथून शिक्षिका म्हणून निवृत्त झाले. मला दोन मुली आहेत.दोघींचीही लग्न झालीत. मोठी मुलगी शीतल आयुर्वेद डाॅक्टर आहे. धाकटी मुलगी रश्मी इंजिनियर आहे. शीतल गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी येथे असते,सध्या मी तिच्याकडेच असते.
रश्मी नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे असते. माणसाच्या आयुष्यात कधी कधी अशी काही परिस्थिती उद्भवते की काही निर्णय त्याला अपरिहार्यपणे घ्यावे लागतात. रश्मीच्या बाबतीत असं झालं की 28 जानेवारी 2016 ला रश्मीच्या वडिलांचं हार्टअटॅक येऊन निधन झालं. रश्मी पंधरा दिवस सुट्टी घेऊन आली,सर्व सोपस्कार पूर्ण करून परत कामावर रुजू झाली. लगेच जून महिन्यात तिचे सासरे वारले,त्यामुळे तिला पुन्हा सुटी घेऊन नागपूरला रहावं लागलं. या सर्व घडामोडीत तिचं कंपनीच्या प्रोजेक्टकडे दुर्लक्ष होऊन,तिला कंपनीत त्रास झाला आणि तिची नोकरी सुटली. तिचे नोकरीसाठी शोध आणि प्रयत्न सुरू झालेत ती मला म्हणाली आई मी तर महाराजांना प्रार्थना करतेच आहे पण माझ्यासाठी तू पण त्यांना विनंती कर,,त्याप्रमाणे मी महाराजांसमोर बसले आणि मंगळवार,बुधवार व गुरुवार असं तीन दिवसांचं पारायण व लगेच म्हणजे गुरुवारी झुणका भाकर नैवेद्य! अशी अकरा पारायणं महाराजांसमोर कबूल केली. त्याच विचारांच्या तंद्रीत असताना रश्मीचा फोन आला,आई माझं काम होईल नं? केव्हा पर्यंत व्हावं? आता या प्रश्नाचं उत्तर माझ्या जवळ नव्हतं ,पण तिला काहीतरी धीर देणं आवश्यक होतं. मी हातात पेन घेऊन कॅलेंडर समोर उभी झाले. त्याच तंद्रीत अकरा पारायणं केव्हा पूर्ण होतात याचा विचार केला,महाराजांकडे पाहून म्हटलं,’महाराज लेकीला एक तारीख सांगतेय ‘ आणि तिला म्हटलं पंधरा डिसेंबर पर्यंत तुझं काम व्हायला हरकत नाही. असं म्हणून मी पंधरा डिसेंबर या तारखे भोवती एक वर्तुळ केलं.
श्रध्देने केलेल्या गजानन विजय ग्रंथ पारायणांची माझी संख्या पुढे सरकू लागली. एक दिवस रश्मीने फोनवर मला सांगितलं,’आई 26 नोव्हेंबरला मला इंटरव्हयू साठी बोलावणं आलं आहे’, मी अत्यानंदाने फोन हाती असतानाच कॅलेंडर समोर ओढलं, आणि पाहिलं तर आश्चर्याचा धक्का बसला, माझ्या अकराव्या पारायणातला तो दिवस होता. पण मग आता माझ्या समोर प्रश्न उभा ठाकला की, मी महाराजांचं स्मरण करीत त्या दिवशी पंधरा डिसेंबर तारखेला गोल का केला?असो रश्मीला शुभाशिर्वाद देऊन फोन ठेवला.
कंपनीत इंटरव्हयू पार पडला, इंटरव्हयू चांगला झाला. त्याच संध्याकाळी तिचा फोन आला, ‘आई इंटरव्हयू छान झाला माझी निवड झाली आणि मला पंधरा डिसेंबरला जाॅईन व्हा असं सांगितलं आहे ‘! तिच्या या वाक्याने माझ्या मनात दोन गोष्टी प्रकर्षाने प्रकट झाल्यात, एकतर पंधरा डिसेंबर ही तारीख कळत नकळत आधीच वर्तवल्या गेली होती आणि दुसरं म्हणजे कदाचित महाराजांचं सांगणं आहे, बाई गं केवळ अकरा पारायणांवर थांबू नकोस!पुढे पंधरा तारखेला माझं चौदावं पारायण संपलं, मग मी न थांबता एकशे आठ पारायणं पूर्ण केलीत आणि इथे वेगळं सांगण्याची गरज नाही की रश्मीच्या मनात गजानन महाराजांविषयीची भक्ती वाढीस लागली.
पुढे 4जून 2018ची गोष्ट, मोठ्या मुलीला, शीतलला, ताप येऊन श्वास घ्यायला खूप त्रास होऊ लागला. श्वास घेणेच कठीण झाल्यामुळे तिला तातडीने नागपूरचे ह्रदय रोग तज्ञ डाॅ माहूरकर यांच्याकडे अॅडमिट करणे क्रमप्राप्त झाले. डाॅक्टरांनी त्यांच्यापरीने सर्व उपचार लगेच सुरू केले. कुठलीही शंका शिल्लक राहायला नको म्हणून तिच्या सर्व टेस्ट करण्यात आल्या. अगदी ब्लड टेस्ट, हार्टचा ई. सी. जी. ,लंग्जच्या टेस्ट, सर्व पार पडल्या.इतकेच नाही तर स्कॅन आणि एम आर आय सुध्दा केले, पण सर्व टेस्टस् नाॅर्मल आल्यात. डाॅक्टरांना काही निदान होत नव्हतं. औषध दिले की तेवढ्यापुरतं बरं वाटायचं, पण पुन्हा येरे माझ्या मागल्या होऊन पंधरा पंधरा दिवसांत तीन वेळा अॅडमिट करावे लागले. डाॅक्टर बदल, हाॅस्पिटल बदल, सर्व झालं. डाॅक्टरांना सुध्दा आश्चर्य वाटलं की असं का व्हावं?ताप मात्र रोज चढायचा, उतरायचा, ताप कमी होत नव्हता, तिकडे श्वासाचाही त्रास होतच होता. आम्हा सर्वांसाठीच तो चिंतेचा विषय झाला.
मग काय?संकट काळी सहाय्य करीती संत अथवा देव हो!त्या काळात तशीही चिंतेमुळे स्वस्थ झोप लागत नव्हतीच, एके रात्री अस्वस्थ झोप आणि अर्धवट ग्लानी अशा सारख्या अवस्थेत, आतून सूचना झाली
‘आशाबाई संत शिरोमणी श्री गजानन महाराजांना शरण जा!’ पाठोपाठ ओव्यांचं स्मरण झालं.. आता वैद्य गजानन/तारो अथवा मारो इसी/अंगारा लावा प्रतिदिवसी/ तिर्थ द्यावे प्यायासी/समर्थांच्या पायाचे. मी त्याच रात्री मनोमन महाराजांना संकल्प केला, महाराज उद्या पासून मी रोज अध्याय तेरावा, तुमच्या समोर बसून वाचणार. आमच्या घरी शेगांव संस्थान कडून महाराजांची प्रसादरूपी मिळालेली मूर्ती आहे. त्या मूर्तीसमोर सकाळीच मनापासून प्रार्थना करून अध्याय तेरावा वाचण्यास प्रारंभ केला. सोबतच एका ग्लासमधे तीर्थ म्हणून पाणी ठेवलं, त्यात शेगांवहून आणलेला अंगारा चिमूटभर टाकला. अध्याय वाचायचा आणि नंतर गण गण गणांत बोते हा एक माळ जप करायचा. तीर्थ महाराजांच्या चरणाला लावून शीतलला प्रार्थनापूर्वक प्यायला सांगायचं असा उपाय सुरू केला, सतत एक महिना हा क्रम चालला, हळू हळू तिचा ताप तर गेलाच आणि श्वास घेण्याचा त्रासही कमी झाला. मी लगेच महाराजांजवळ एका वर्षात शेगांवला पाच वार्या करण्याची इच्छा व्यक्त केली.
सप्टेंबर 2018 पासून माझ्या वार्या सुरूही झाल्या. योगायोगाने माझ्या पहिल्या वारीत मी शेगांवला बंकट सदनात “श्री गजानन अनुभव ” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहून, एक सात्विक आनंद मिळवू शकले.
असो. नोकरीच्या अनुभवातून लहान मुलीच्या मनात श्रध्दा वाढीस लागली तर तब्येतीच्या अनुभवातून थोरल्या शीतलच्या मनात गजानन महाराजांचं स्थान अधिक दृढ झालं. आता आम्हा तिघींसाठी व जावयांसाठीही ‘गजानन महाराज ‘आमच्या जीवनात एक फार मोठा आधार झाला आहे आणि एकमेकींना धीर देण्यासाठी परवलीचे शब्द झाले आहेत. श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव– आशा भाऊराव इटनकर
आरमोरी (गडचिरोली)
शब्दांकन–जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त
…………………………………….
श्री गजानन अनुभव कुठे मिळेल