…………………………………….
“श्री ”
गजानन महाराज की जय (अनुभव 63🌺 )
*माऊली गजानन*
जय गजानन! मी सौ मंजिरी श्रीपाद पाटील, पुर्वाश्रमीची मंजिरी गजानन जोशी. माझ्या शालेय जीवनात मी कधी वडिलांना श्रीगजानन महाराजांची पोथी वाचताना पाहिलं, तेव्हा त्यातील चित्रांविषयी त्यांना कुतुहलानं विचारलं आणि महाराजांचा फोटो त्या पोथीत वारंवार पाहिला एवढीच काय ती माझी तेव्हा महाराजांशी झालेली ओळख ! आमच्या एक दूरच्या नातेवाईक कुणी पुष्पाताई म्हणून होत्या,त्यांनी त्यांच्याकडील गजानन विजय ग्रंथ आम्हाला दिला म्हणून गजानन विजय ग्रंथ परिचयाचा झाला. बाकी आज आयुष्याची सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झालीत पण शेगांवला जाण्याचा योग म्हणाल तर अजूनही आलेला नाही. मात्र लहानपणी एक गोष्ट माझ्या बालमनावर नकळत बिंबवल्या गेली, ती म्हणजे गजानन महाराजांना संकटकाळी हाक घातली तर ते हाकेला ओ देतात आणि मी सहजपणे लहानपणीच काही अडचण आली की ‘श्री गजानन महाराज की जय ‘ म्हणण्यास आरंभ केला.
मी नवव्या वर्गात असतानाची गोष्ट,मी तेव्हा होस्टेलवर शिकायला होते. एकदा मी संध्याकाळी वाचनालयात अभ्यास करीत बसले,सोबत माझं दप्तर,आत कंपाॅस आणि कंपाॅस मधे रुमची किल्ली होती. काही वेळाने मी दप्तर घेऊन रुमवर परतले,पहाते तो आत कंपाॅस नाही. कंपाॅसात रुमची किल्ली,बॅगची किल्ली, बॅगमधे पैसे. कंपाॅस नाही हे लक्षात आलं आणि मी रडायला लागले. रडता रडता दुःखाचा आवेग वाढत गेला,मी हमसून हमसून रडायला लागले आणि लक्षात आलं,हीच ती वेळ की मी गजानन महाराजांना आठवायला हवं,मी रडता रडता त्या रडवेल्या आवाजात महाराजांना म्हटलं माझी किल्ली मिळू द्या,मी एकवीस वेळा ‘श्री गजानन महाराज की जय ‘म्हणेन. इकडे मी जयघोष सुरू केला सोबत रडणंही चालू होतं. पुन्हा एक मन म्हणालं अगं एकवीसने काय होणार?पुन्हा म्हटलं महाराज किल्ली मिळू द्या,शंभर वेळा ‘श्री गजानन महाराज की जय ‘म्हणेन. एकीकडे रडतेय दुसरीकडे म्हणतेय, माझा शंभर पर्यंत जप होत आला आणि कानावर आवाज आला,बाजूला कुणी तरी जोरात विचारत होतं ‘कुणाचा कंपाॅस हरवला आहे का?’ मला सापडला आहे ओळख पटवून घेऊन जा ‘ मी डोळे पुसत तिकडे धाव घेतली. कंपाॅस मिळाला होता. मी कंपाॅसमधून आठ आण्याचं नाणं घेऊन समोरच असलेल्या दुकानातून गोड म्हणून,गोळ्या बिस्किटं आणून महाराजांना नेवैद्य दाखविला. त्या दिवशीचा माझा आनंद अवर्णनीय होता.
लहान मुलांना त्यांची वस्तू सापडली की आनंद होतो हा भाग त्या मागे होताच पण त्याहीपेक्षा आमच्या घरची गरीबी,हा त्यामागील एक महत्त्वाचा मुद्दा होता.
आमचे वडील जेमतेम दहावी पर्यंत शिकले,ते मेडीकल शाॅपमधे रोजंदारीवर कामाला होते. सुटीचे पैसे कापून हातात पैसे येणार,काय उत्पन्न असणार अशा व्यक्तीचं?आईला जन्मापासूनच ऐकू येण्याचा प्रॉब्लेम होता,त्यामुळेच तिला धड बोलताही येत नव्हतं. त्यावर उपाय नव्हता. आईच्या माहेरी आर्थिक स्थिती ठीक होती. आईच्या वडिलांनी लग्नाच्या वेळी पुढे सर्व ठीक होईल असा विचार केला होता,पण आईचं लग्न ठरलं आणि तिच्या वडिलांना वर बोलावणं आलं. आईची ही अशी स्थिती त्यामुळे तिनं कुठं काम करण्याचा प्रश्नच नव्हता. वडील कधी काही कारणानं कामावर जाऊ शकले नाही की त्यांचीही नोकरी केव्हाही सुटायची,मग नवीन दुकान शोधायचं,काही दिवस पगार बंद,मग घरमालक पैशासाठी ओरडा करणार की घर सोडण्याची वेळ यायची,विंचवाचं बिर्हाड पाठीवर.
पण माझ्या या गरिबीच्या कहाणीत मला आतून एक गोष्ट नेहमीच जाणवत राहिली की कुठेतरी माझ्यावर गजानन महाराजांचा आशिर्वाद आहे. कारण माझ्या पुर्वायुष्यात दारिद्र्याची झळ मला पोहोचली,मी पोळले, पण माझ्या जीवनाची राख झाली नाही. आमच्या सारख्या आर्थिक स्थितीत,शिक्षण होणं,शाळेत जाणं,ही अशक्यप्राय गोष्ट होती,पण मामा मावशी पाठीशी उभे झाले म्हणून शिक्षण होऊ शकलं. अंग झाकायला कापड मिळेल का हा प्रश्न उभा झाला पण आईच्या माहेराहून साथ मिळाली. आज खायला मिळालं,उद्या मिळेल का?हा बरेचदा प्रश्न असायचा. उपासमार झाली,अनेकदा अर्धपोटी उठलो,पण भूकबळी नाही ठरलो. शिक्षणासाठी पैसा नव्हता,पण भगवंताने बुद्धी उत्तम प्रदान केल्याने मामा जे होस्टेलमधे पैसे भरत होता त्यात आम्हा दोघी बहिणींना मिळणारी हुशारीची स्काॅलरशीप केव्हातरी हातभार लावू शकत होती. म्हणजे एकीकडे आयुष्याची खडतर पाऊलवाट तर दुसरीकडे महाराजांची साथ. अर्थात पै पै ची किंमत लाखमोलाची होती. मग तुम्हीच सांगा,त्या दिवशी कंपाॅस हरवला असता तर?पण नाही हरवला!माझ्या बालमनाची त्या दिवशी खात्री पटली ‘तुझ्या पाठीशी गजानन महाराज आहेत. ‘
त्या संध्याकाळी महाराजांना नैवेद्य दाखवून रात्री झोपी गेले. गाढ झोप लागली,आणि मला पडलेल्या स्वप्नात मी सांगलीच्या गणपती मंदिरात,राजे साहेबांच्या गणपती मंदिरात गेले. तिथे तीर्थकुंडाच्या बाजूला गजानन महाराज बसलेले दिसले. त्यांनी मला जवळ बोलावलं,म्हणाले,’चिंता करू नकोस. गजानन विजय ग्रंथ वाचत जा,तुझं सगळं नीट होईल!’महाराज अदृश्य झाले आणि मी ‘गजानन विजय ग्रंथ सार’ वाचण्यास सुरुवात केली. पुढे ते शाळकरी जीवन संपलं,वाचनही खंडित झालं.
1990-91 ची गोष्ट,मी बी.काॅम च्या पहिल्या वर्षाला होते. मी आणि माझी बहीण दोन चार लहान मुलांना शिकवून बुडत्याला काडीचा आधार देऊ पहात होतो. दोन दिवस सुट्टी घेतली म्हणून वडिलांचं दुकान मालकाशी वाजलं,त्यानं वडिलांना घरी बसवलं. दोन दिवस आम्ही भुकेले होतो. तेव्हा आम्ही हरीपूरला रहात होतो. संध्याकाळी मी आणि माझी बहीण पाय आणि मन मोकळं करण्यासाठी बाहेर पडलो. सांगली सिटी पोस्ट ऑफिसच्या भागातून फिरत होतो,पोटात भुकेचा डोंब उठलेला,पण घरी जाऊन काही खायला मिळण्याची शक्यता नव्हतीच.कसं व्हावं या विचारात बहिणीनं मला सुचविलं ‘मंजू ‘ तुला मागे महाराजांनी गजानन विजय पारायणचं सुचविलं होतं,ते तुझं होत नाही आहे. आता आपल्याकडे अनायसं गजानन विजय ग्रंथ आहे,उद्या पासून तू मोठ्यानं पारायण कर मी ऐकीन. मला ते पटलं,रस्त्यातच आम्ही दोघींनी महाराजांना प्रार्थना केली,म्हटलं,महाराज या परिस्थितीत तुम्हीच सांभाळ करा. पारायणाचा विचार मनात घेऊन आम्ही माघारी फिरलो,गावाच्या कमानीतून आत येताच एक श्रीकृष्ण मंदीर आहे. तिथे शेजारी एक गद्रे म्हणून बाई रहायच्या,त्यांनी अंदाजाने आम्हाला विचारले,’तुम्ही जोशी का गं?’ आम्ही प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं,एक गृहस्थ तुमच्याकडे येऊन गेलेत,घराला कुलूप होतं म्हणून तुमचं काही सामान आमच्याकडे ठेवलं आहे. आम्ही पाहिलं तर दहा किलो गहू,तांदूळ,ज्वारी,रवा,पोहे,साखर,तेल,चहा पावडर असं बरंच सामान होतं. पारायणाचा विचार करताच एक आनंदाचा क्षण अनुभवत होतो. पारायण सुरू झालं,चार दिवस झालेत आणि दुकान मालक दारात उभे राहिले. वडिलांना आग्रहाने बोलवायला आले होते. म्हणाले,चार दिवसांपासून आतून वाटायला लागलं,मी तुमच्या कुटुंबाला उपाशी ठेवतो आहे. म्हणून मला अंतःस्फूर्ती होऊन मी काही सामान ठेवून गेलो होतो. मी आणि बहिणीनी लगेच एकमेकांकडे पाहिलं,त्याला स्फूर्ती देणारे कोण हा अंदाज आम्ही करू शकत होतो.
आता तो काळ बदलला,आम्ही दोघी आपापल्या घरी सुखी आहोत. मला एक मुलगा एक मुलगी,मुलगी इंजिनियर होऊन पुण्यात नोकरीला आहे. आमची आई आता या जगात नाही. वडिलांना आम्ही एक लहान फ्लॅट घेऊन दिला आहे.
मध्यंतरी मुलीला पहिला पगार मिळाला,तो तिने तिच्या आजीच्या,माझ्या सासूबाईंच्या हाती देऊन म्हटलं ‘आजी हे पैसे जपून ठेव. मला शक्य होईल तेव्हा आपण सर्व स्पेशल गाडी करून शेगांवला जाऊ. ‘
मी हे दृश्य पाहिलं तेव्हा पुर्वायुष्याचा सर्व चित्रपट झरकन नजरेसमोरून पुढे गेला. महाराजांना म्हटलं महाराज अन्य परिस्थिती बदलली हे चांगलं झालं. पण एक गोष्ट मात्र तशीच स्थिर असू द्या,अर्थात माझ्या मुखी तुमचं नाव! श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव– सौ. मंजिरी श्रीपाद पाटील,सांगली
शब्दांकन — जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸 अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त.