भक्तांना आलेले अनुभव
श्री. वसंत दामोदर गायधनी, (सीह्न २६/५, केतन हाईटस, कोथरुढ, पुणे-२९, फोन नं. ५४५०५७८.)
मी एक सर्वसामान्य-मध्यमवर्गीय ब्राह्यण कुटुंबातील गृहस्थ आहे. माझी पत्नी श्रीगजानन महाराजांची पोथी नियमितपणे पठन करीत होती. तिच्यामुळेच मला श्री गजानन महाराजांची आवड व भक्ती निर्माण झाली आणि त्याच जोरावर मला निरनिराळे चमत्कार अनुभवास आले.
मी, विवाह जमविणे, पुस्तक विक्री असे व्यवसाय करीत होतो. पुस्तक विकण्यासाठी मला अधूनमधून मुंबईला ये-जा करावी लागे. माझे हातावरच पोट होते. एका वेळेस महिना अखेरीस घरातील सर्व धान्य संपले होते. खिशात पैसे नव्हते. काय करावे असा विचार चालू होता. तेवढ्यात दार वाजले. एक अपरिचित व्यक्ती समोर उभी होती, म्हणाली, माझ्या मुलीचा विवाह करावयाचा आहे तर आपण स्थळे देणार का ? आपली फी किती ? मी सांगितलं फक्त १५ रुपये. ती व्यक्ती माझ्या हातावर २५ रुपये ठेऊन निघून गेली व माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिले शेवटी सर्वांच्या पोटाचा प्रश्न होता ना तो !
असाच एक अनुभव. नेहमीच्या किराणामालवाल्या मारवाड्याकडे महिन्याचे सामान आणण्यास मुले गेली होती. त्याने निरोप दिला, मागील थकबाकी दिल्याशिवाय पुढील सामान देणार नाही. आता प्रश्न पडला कसं होणार ? असाच एक महिन्यांनी त्याच्या दुकानात बसलो होतो. सध्या व्यवस्थित धंदा होत नाही, असे तो म्हणाला. श्रीगजानन महाराजांचा फोटो लावून एक लिंबू, ग्लासात ठेवायला दिले.
श्री महाराजांच्या कृपेने त्याचे दुकान तर व्यवस्थित सुरु झालेच, पण माझाही किराणामालाचा प्रश्न कायमचा सुटला होता. दुकानदाराने पण पैसे पाहिजे असा तगादा लावला नाही अजूनही तो दुकानदार व त्याची मुले माझ्याकडे येत असतात.
व्यवसायामुळे मला नेहमी घराबाहेर राहावे लागे. अचानक माझे कसबा पेठेतील घर पडले त्यावेळेस मुले घरातच होती. परंतु कोणालाही दुखापत झाली नाही. चौकशीला आलेला इन्स्पेक्टर माझा जुना मित्रच निघाला सर्व मौल्यवान सामान रात्रीच माझ्या पत्नीच्या ताब्यात देण्यात आले या मागेसुद्धा श्री महाराजांचीच कृपा होती.
एकदा रेल्वेतून प्रवास करीत असताना समोर दोन महिला प्रवाशी होत्या. त्यांच्यामध्ये श्रीक्षेत्र शेगाव येथे जाण्यासंबंधी चर्चा सुरु होती. शेगाव येथे महाराजांच्या दर्शनाला जाणे आपल्याला परवडण्यासारखे नाही. म्हणून खिश्यातील रु ५/- दानपेटीत टाकण्यासाठी त्यांच्याजवळ दिले. मनात इच्छा निर्माण झाली. शेगाव येथे जाण्याची, पण गृहस्थाश्रमामुळे ते अशक्य वाटत होते.
माझे वडील नाशिक येथे प्रसिद्ध ज्योतिषी होते व वडीलबंधू पण त्याच व्यवसायात होते. मला व माझ्या धाकट्या बंधूला ज्योतिषाबद्दल विशेष आवड व शिक्षण नव्हते, पण अनुवंशिकता व थोडेफार पुस्तकी वाचन व व्यवसायाची गरज यामुळे मी कधी कधी थोडेफार ज्योतिष सांगायचो. माझ्या मित्रांमध्ये बाबाला थोडेफार ज्योतिष कळते, असा समज होता. माझ्या एका मित्राचे मिठाईचे दुकान होते.माझे अधुनमधुन दुकानात जाणे-येणे होते. दुकानात आतपर्यंत जाण्याची मला परवानगी होती. एकदा सहज म्हैसूर वडी जास्त लाल झालेली दिसली. त्याला विचारले असता, तो गंभीर झाला मला म्हणाला, बाबा, बरेच वर्ष हा मिठाईचा धंदा सुरु आहे. परंतु सध्या योग्य कारागिर मिळत नाही. हा धंदा सोडून कुठला धंदा करु हे सुचव, मी विचार करुन सांगितलं, होलसेल शुगर अॅन्ड आॅईलचा धंदा सुरु कर, पण एक अट आहे. धंदा व्यवस्थित सुरु झाल्यावर शेगाव येथे जाऊन श्रीगजानन महाराजांचे दर्शन मात्र घेऊन ये.
साधारणत: एक महिन्याने सहज मित्राच्या दुकानात गेलो असता आॅईल अॅन्ड शुगर डेपोचा धंदा सुरु केल्याचे दिसले व श्रीगजानन महाराजांच्या कृपेने धंद्यात फायदा होत होता. त्यानंतर आठ दिवसांत श्री क्षेत्र शेगाव येथे मला घेऊन जाण्याचा बेत त्याने तयार केला. श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्याची इच्छा तर पूर्ण झालीच, पण दर्शनाने शरीर रोमांचित झाले.
माझ्या पत्नीची शेगाव येथे जाण्याची इच्छा होती, पण परिस्थितीमुळे अशक्य वाटत होते. एकदा आम्ही दोघंही शेगाव येथे गेलो होतो. माझी ज्योतिषामुळे जि. अकोला येथील सदगृहस्थांशी ओळख झाली होती. महाराजांचे दर्शन घेऊन येताना त्यांच्या घरी गेलो. पुण्यात एक-दोन वेळाच भेटल्याने सदर सदगृहस्थ कसा प्रतिसाद देतील यांचा अंदाज नव्हता, पण त्यांची बदली अकोला येथून दुसरीकडे करण्याचे आदेश त्यांना मिळाले होते. सोबतचा श्री शेगावचा प्रसाद त्यांना दिला व बदलीचे आदेश रद्द झाल्याचे पत्र त्यांना मिळाले त्यामुळे अकोला येथील मुक्काम वाढला. तेथील आठ-दहा लोकांना श्री महाराजांच्या आशिर्वादाने गंडेदोरे, नारळ असा प्रसाद दिला आणि त्यांची दु:खे दूर होण्यास मदत झाली. श्री महाराजांच्या कृपेने त्या सदगृहस्थाने मला पुणे येथे जाण्या-येण्याचा खर्च दिलाच व पत्नीला साडी व मानधन दिले. श्रीमहाराजांच्या कृपेने मला मिळालेला अनपेक्षित लाभच म्हणावा लागेल.
पुस्तक विक्रेत्याच्या व्यवसायाने मला मुंबई येथे जा-ये करावी लागत होती. यामुळे शारीरिक दगदग होत होती. एकदा सकाळी पिंपरी रेल्वे स्टेशनवरुन मुंबई येथे जाण्यासाठी निघालो होतो. तिकीटघराच्या जवळच अचानक डोळ्यासमोर अंधारी येऊन खालीच बसलो. मुंबई येथे पोहोचू शकू की नाही ? असा विचार करुन घरी परतलो मनात एकच विचार आता आपल्या कुटुंबाचे कसे होणार हा गहन प्रश्न समोर होता. कारण शरीर थकल्यासारखं वाटत होतं. घरी आल्यावर केव्हा झोप लागली, ते समजले नाही. सर्व शरीर घामाने ओले चिंब झाले होते. मनाचा हिय्या करुन दुसरे दिवशी मुंबई येथे जाण्यासाठी निघालो परत कालचीच घटना घरी घडली. श्रीगजानन महाराजांच्या फोटोसमोर उदबत्ती लावून त्यांना मनाची स्थिती सांगितली आणि मार्ग दाखवा अशी विनवणी केली आणि आठच दिवसांत श्रीगजानन महाराजांच्या कृपेने लोक भविष्य विचारण्यासाठी येऊ लागले. लोकांना दिलेले तोडगे यशस्वी ठरु लागले.
त्यावेळेपासून आजपर्यंत ज्योतिषशास्रात कोणत्याही प्रकारची पदवी न घेता सुद्धा श्री महाराजांच्या कृपेने ज्योतिषशास्राच्या सहाय्याने स्वार्थाच्याबरोबर परमार्थ साधला जातोय. प्रवासात, घरी असताना कोणतीही अडचण उत्पन्न झाल्यावर श्री गजानन महाराजांच्या नुसत्या स्मरणाने सुद्धा आजवर अडचणींतून मार्ग निघत आला आहे.
श्री गजानन महाराजांचा एक भक्त.
श्री वसंत दामोदर गायधनी.
सीह्न २६/५, केतन हाईटस, कोथरुड, पुणे-२९, फोन. नं. ५४५०५७८