भक्तांना आलेले अनुभव
संदीप गोविंद गायधनी, (वृंदावन हौ. सो. कोथरुड, पुणे.)
सातवीत असताना मी माझ्या आईबरोबर प्रथम गजानन महाराजांच्या मठात गेलो होतो. तिथे महाराजांचं दर्शन घेतल्यावर माझ्या मनाला खूपच प्रसन्न वाटलं. एका आगळ्याच शांततेचा आणि पावित्र्याचा अनुभव मला आला. आजही मला तीच अनुभूती येते. त्या दिवसापासून मी दर गुरुवारी मठात जायला प्रारंभ केला. आजतागायत त्यात खंड पडलेला नाही.
महाराजांच्या कृपेने माझं लग्न झालं. लग्नानंतर आम्ही घर घेण्याचं ठरवलं. मनाशी घराची योजना आखली. घरासाठी अर्थातचं कर्ज काढावं लागणार होतं. कर्ज मिळवण्यासाठी आमची खटपट सुरु झाली. अनेक कंपन्यांना अर्ज केले; पण मनासारखं आवश्यक तेवढं कर्ज मिळवण्यात यश येत नव्हतं.
त्याच दरम्यान, आम्ही शेगावला महाराजांच्या दर्शनाला गेलो. दरवर्षी न चुकता आम्ही शेगावला जात असतो. त्याप्रमाणे त्यावर्षीही आम्ही शेगावला गेलो होतो. महाराजांचं दर्शन शांतपणानं झालं. मोठ्या समाधानानं आम्ही पुण्याला परतलो. पुण्याला आम्ही पोहचलो. घरी पाऊल टाकलं आणि फोन वाजला. फोन फायनान्स कंपनीचा होता. आम्हाला आवश्यक ते कर्ज त्यांनी मंजूर केलं होतं. आम्हाला खूपच आश्चर्य वाटलं. महाराजांच्या कृपाप्रसादामुळेच हे साध्य झालं होतं. महाराजांचे आशीर्वाद लाभल्यामुळेच आम्ही आयुष्यात आज स्थिरावलो आहोत.
एकदा मी, माझी पत्नी, मेहुणा आणि अन्य काही स्नेही शेगावला गेलो होतो. आम्ही दरवेळेस मंदिरातच प्रसाद सेवन करतो. परंतु त्यावेळेस स्नेह्यांच्या आग्रहाखातर त्यांना दुखवायला नको, म्हणून हाॅटेलमध्ये जायचं ठरवलं. मनातून आम्हांला ते पटत नव्हतं. परंतु अॅडजेस्टमेंट म्हणून गेलो. चार-पाच हाॅटेल आम्ही पालथी घातली, पण स्नेह्यांना एकही हाॅटेल पसंत पडेना. बरीच पायपीट झाली. शेवटी आम्ही त्यांना म्हटलं, आम्ही आता मंदिरातच प्रसाद घ्यायला जातो. तुम्ही हवं तर बाहेर जेवा.
खरं तर प्रसादाची वेळ संपली होती. त्यामुळे बहुतेक आपल्याला उपवास घडणार असच वाटलं, पण आमच्यासाठीच जणू मंदिरात प्रसाद शिल्लक होता. आम्ही मोठ्या आनंदान प्रसाद सेवन केला. आमचं जेवन झालं तरी बरोबरची स्नेहीमंडळी अजूनही चांगल्या जेवणाच्या शोधातच होती.
अशा तर्हेनं महाराजांचाच प्रसाद सेवन करण्याची आमची मनोकामना महाराजांच्याच कृपाप्रसादाने पूर्ण झाली.
त्यानंतर आज तागायत प्रसाद डावलण्याची गोष्ट आम्ही मनातही आणली नाही.
श्री गजानन महाराजांचा एक भक्त.
संदीप गोविंद गायधनी.
वृंदावन हौ. सो. कोथरुड, पुणे.