​भक्तांना आलेले अनुभव – सौ. आशा सुरपूर, (आनंदनगर, पुणे-५१, फोन नं. २४३५६०६७.)

भक्तांना आलेले अनुभव
सौ. आशा सुरपूर, (आनंदनगर, पुणे-५१, फोन नं. २४३५६०६७.)
 दि. २५/०३/२००३. (१) सन १९७१ साली आम्ही पंढरपूर येथे होतो. तेथे माझ्या ओळखीची कु. उषा हरिदास प. पू. गजानन महाराजांची पोथी नित्य वाचत असे. त्यातच तिला महाराजांचा “संचार” होण्यास सुरवात झाली. मला तीच्या घरी दर्शनाला जाण्याचा योग आला. त्यापुढे संचार झाल्यावर ती मला बोलवून दर्शन देत असे. हळूहळू प. पू. महाराजांचा तिच्यामार्फत सहवास वाढत गेला. त्यावेळी अचानक माझ्या पतिराजांना कावीळ झाली व दुखणे वाढत गेले आणि डाॅक्टरांनी पण आशा सोडली. त्याचवेळी संचारात कु. उषा ही तडक आमच्या घरी हातात अंगारा आणि एका वाटीत तीर्थ घेऊन आली. आणि तिने मला खूप जोरात विचारले, रुक्मिणीची ओटी भरलीश का ? मी तर रडतच होते. ह्यांना अंगारा लावून तीर्थ दिले आणि मी म्हणाले, माझी ओटी ती नीट ठेवू दे. मी तिची ओटी नक्की भरीन. आणि काय आश्चर्य प.पू महाराजांच्या कृपेने हळूहळू ह्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली व प्रमोशन देखील मिळाले. नंतर मात्र आम्ही पांडुरंग-रुक्मिणीची महापूजा सर्व नातेवाइकांसमवेत करुन महाराजांच्या सांगण्याप्रमाणे ओटी भरली. या घटनेनंतर मी महाराजांच्या पोथीचे अखंड पारायण करु लागले.

(२) माझ्या पतीची पाटबंधारे खात्यात नोकरी असल्यामुळे सतत बदली होत असे. नवीन गावी गेल्यावर सर्व स्थिरस्थावर होऊन ओळखी वाढेपर्यंत प.पू. गजानन महाराजांची पारायणे चालू होती. भक्ती आणि श्रद्धा दिवसेंदिवस वाढतच होती. कधी सुवासाच्या माध्यमातून, कधी स्वप्नात येऊन, कधी अनपेक्षित घटना घडून आमचे प.पू. महाराजांशी नाते दृढ होत गेले. नंतरच्या काळात महाराजांचे अनेक भक्त भेटले व त्यांचे आशीर्वाद मिळाले. १९७९ साली आम्ही डिंभे गावी बदलून गेलो. तेथील वसाहतीमधील महिला मंडळात भजन, पारायण व महाराजांच्या अनुभवाद्वारे त्या महिलांची भक्तीसुद्धा वाढत होती. एक दिवस महिला मंडळाची अचानक शेगावची ट्रिप ठरली. त्यात आम्ही काही महिला व लहान मुलेच होतो. ट्रिप खूपच छान झाली व तिथे महाराजांनी एका भिकार्‍याच्या वेषात आम्हांला दर्शन दिले. वेष भिकार्‍याचा होता, पण चेहरा साक्षात महाराजांचा होता. आम्हां सर्वांना त्यांनी आल्या वाटेने परत जा ! असा सल्ला दिला. ट्रिपमधील बायकांचे म्हणणे होते की शेगावहून मराठवाड्यातील औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ करुन जाऊ पण महाराजांनी सांगितल्यामुळे मी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला आणि शिर्डीमार्गे जाऊ या का ? असे विचारले. सर्व बायकांनी आनंदाने होकार दिला. शिर्डीला साईबाबांचे व्यवस्थित दर्शन घेऊन आम्ही परतीच्या मार्गाने निघालो व मंचरला आलो तिथे अचानक रस्ता रोको अंदोलन सुरु झाले होते. आम्ही सर्वजणी त्या दिवशी रात्री सुखरुप घरी पोहोचलो. नंतर दहा दिवस बस व रेल्वेगाड्या बंद होत्या. डोळ्यांत पाणी आणून मी महाराजांना नमस्कार केला व आभार मानले. त्यादिवशी महाराज योग्य वेळी धावून आले नसते तर ?

(३) मी १९८० ते ८१ च्या दरम्यान मुलांच्या शिक्षणासाठी पुणे येथे आमच्या स्वत:च्या घरी राहायला आले. प.पू. गजानन महाराजांची पारायणे चालूच होती. अचानक प.पू. महाराजांनी जागेपणीच १२१ पारायणे कर ! म्हणून आग्रह केला. माझी तब्बेत तेव्हा बरी नव्हती. म्हणून मी स्पष्ट नकार दिला. मला परत महाराजांचा आवाज ऐकू आला, मी सांगतो तो खरचं कर आणि बघ. मी त्यांना म्हणाले हे तुम्ही करवून घेतले तर शक्य आहे अन्यथा नाही. त्यांनी होकार दिला. महाराजांनी शब्द दिला आणि जादू घडावी याप्रमाणे सणवार, पाहुणे-रावळे, अनंत अडचणी पार करुन सव्वा वर्षात १२१ पारायणे पार पडली. शेवटची ११ पारायणे राहिली होती तेव्हा माझे श्रद्धास्थान कु. उषा हरिदास येथे पुण्यात आली. माझ्या प्रत्येक पारायणाच्या वेळी ती संचारात माझ्यासमोर पाटावर बसत असे. शेवटच्या पारायणानंतर तिने मला कडकडून मिठी मारली आणि विचारले, काय करुन घेतली ना पारायणे ?

    अनेक चढ-उतार आयुष्यात आले तरीही प.पू. महाराज माझ्या पाठीशी आहेत हा माझा दृढ विश्वास आहे. पुण्यात आनंदनगर मध्ये भा.द. खेर यांच्याजवळ राहिल्याने त्यांच्या पितृप्रेमाबरोबरच  वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शनही मला लाभले. शेवटी इच्छा एकच, महाराजांच्या चिंतनात शेवट गोड व्हावा. म्हणतात ना, सदगुरुसारिखा असता पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ?
श्री गजानन महाराजांचा एक भक्त.

सौ. आशा सुरपूर.

आनंदनगर, पुणे-५१. फोन नं. २४३५६०६७

One thought on “​भक्तांना आलेले अनुभव – सौ. आशा सुरपूर, (आनंदनगर, पुणे-५१, फोन नं. २४३५६०६७.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.