भक्तांना आलेले अनुभव
सौ. मनिषा घोरपडे, (आनंदनगर, पुणे-५१.)
दि. १६/०१/२००३.
श्री गजानन महाराजांच्या चरणी सादर वंदन.१९८७ साली माझी पारायणे पूर्ण झाली की, मी पिठले-भाकरीचा नैवेद्य करीत असे. घरी कुणी आले की त्यांना प्रसाद देई. माझा एक मावस भाऊ श्री. प्रमोद व त्याची पत्नी सौ. अनुराधा व मुलगा आदित्य हे आमच्याकडे वरचेवर ये असत. नेमके त्यावेळी माझे पारायण झालेले अन पिठल-भाकरीचा प्रसाद तयार. त्या दिवशी असेच हे उभयतां आले तर तिला म्हटले, वा तुम्ही आलात अन माझे पारायण झाले. तुम्हाला पिठल-भाकरीचा प्रसाद देते, तर तिची थोडी नाराजी दिसली म्हटले, काय झाले ? ती म्हणाली, आज तुमचे राहू द्या. आपण सर्वजन बाहेर जेवायला जाऊ. मी तिला समजावून सांगितले, तू पिठले-भाकरीचा घास घे. गुलाबजाम केले आहेत ते खा. आपण संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊ. प्रमोद म्हणाला, आम्ही जेवतो, पण तीचा वाढदिवस असल्याने तुम्हांला घेऊन बाहेर जेवायला जायचे असे आमचा बेत होता. आम्ही सर्वांनी जेवण केले व थोडी विश्रांती घेऊन बाहेर पडलो. कोथरुढच्या रस्त्याने सिंहगड रस्त्याला लागलो. थोडासा कच्चा रस्ता व चढ असलेल्या रस्त्यावरुन आम्ही पुढे आलो व आमच्या मागोमाग मोटरसायकलवरुन ते तिघे येत असता मोटरसायकलवरुन पडले. पटकन उठून पाहिले तर आदित्यला मुका मार लागल्याचे आमच्या लक्षात आले. तेथून आम्ही प्रमोदच्या घरी गेलो, तर आदित्यला उलटी झाली. आम्ही जवळच्या डाॅक्टरांच्याकडे गेलो, तर त्यांनी ताबडतोब के.ई.एम. किंवा रुबी हाॅस्पिटलमध्ये अॅडमीट करायला सांगितले. आम्ही रुबी हाॅस्पिटलमध्ये गेलो. त्यांनी त्याला आय.सी.यू. त दाखल केले. सौ. अनुराधा व आम्ही महाराजांची क्षमा मागितली. दुसर्या दिवशी आदित्य खडखडीत होऊन घरी आला.
*प्रसादाचा इन्कार याचा हा अनुभव*
(२) अशी पारायणे चालू असताना ज्या दिवशी पारायण पूर्ण होई, त्यि दिवशी कोणी अचानक आले तर त्यांना सव्वा रुपया व नारळ देत असे. एके दिवशी माझे पारायण पूर्ण झाले. वेळ सकाळी ८:३० ते ९:०० मी तुळशीला पाणी घालून घरात येत होते. अजून मी दारातच होते तो बेल वाजली, मी मागे वळून पाहिले तर एक गोरेपान शर्ट-पायजमा घातलेले हसतमुख गृहस्थ दारात उभे होते. मी म्हटले, आपण कोण ? उत्तर-देव. आपण कोठून आलात ? उत्तर-नागपूरकडून. मी चकित झाले. मी त्यांना सांगितले की, माझे पारायण पूर्ण झाले की मी सव्वा रु. नारळ देते. तो आपल्याला द्यायचा आहे. उत्तर-त्याचसाठी आलो. मी त्यांना घरात येऊन बसायला सांगितले व सव्वा रुपया नारळ देऊन नमस्कार केला.
(३) दिवसभर सर्व्हिस. घरात तीन मुले, आम्ही उभयतां आणि सासूबाई आणि येणारे-जाणारे असे असताना पहाटे तीन-सोडेतीनला उठून वाचन करायचे. स्वयंपाकपाणी करुन आॅफीसला जायची, पण शीण वाटायचा नाही. एकदा असेच वाचन करत असताना गरगरल्यासारखे होऊ लागले आणि गरम व्हायला लागले. त्यावेळी आमच्या किचनमध्ये फॅन नव्हता. म्हणून बेडरुममध्ये फॅनखाली बसून वाचायला सुरवात केली. तेवढ्यात माझे मोठे दीर श्री. सुरेशभावजी यांचा फोन आला की आम्हाला नात झाली आहे. म्हणजे नात झाल्याने वृद्धी होती. म्हणून महाराजांनी वाचनात अडथळा केला होता.
(४) माझी मुलगी कु. गौरी हिचे लग्न ८/१२/९७ ला करण्याचे नक्की झाले. पण तेवढा पैसा हातात नव्हता. आम्ही आमची मॅटेडोअर विकायचे ठरवले, पण ती तेवढ्या काळात जाणे कठीण होते. एकदा मी आॅफीसमधून येताना म्हसोबा गेटच्या स्टाॅपवर उभी होते-बसची वाट पाहत आणि मला श्री गजानन महाराजांची आठवण झाली मी म्हणत होते, स्वामी हो स्वामी, कुठे आहात तुम्ही ? पडलीय बघा मला पैशाची कमी, बरेच वेळ हे आळवणे चालू होते. दुसर्या दिवशी सकाळी सकाळीच फोन. घोरपडे साहेब कुठे आहेत ? त्यांची गाडी मला घ्यायची आहे. माझ्याजवळ कॅश आहे. व्यवहार करण्यासाठी केव्हा येऊ असे कोणतीही जाहिरात नसताना, किंवा गाडी पाहणे वगैरे कोणत्याही व्यवहारांशिवाय काम झाले.
श्री गजानन महाराजांचा एक भक्त.
सो. मनीषा घोरपडे.
आनंदनगर, पुणे-५१. दि. १६/१/२००३.