जे चमत्कार घडतात ते सारे मन:सामर्थ्यावर अधिष्ठित असतात. मानवी मन हेच त्या चमत्कारांचं उपादानकारक आहे. याच सामर्थ्यावर *नराचा नारायण होतो* परंतु ज्या मनावर ही चमत्कारांची कलमं केली जातात ते मन आहे पार्यासारख. किंवा वार्यासारखं चंचल ! ते मन या क्षणी इथे तर दुसर्या क्षणी हजारो मैलाचा प्रवास करुन तिथ जातं. कधी सुखसागरी पोहतं तर कधी दु:खाच्या डोही डुंबत. या मनाचं शास्र शेकडो वर्षापुर्वी या अध्यात्मिक भूमीत निर्माण झालं. पिंडी तेच ब्रह्यांडी या न्यायानं या सर्व मानवी मनांचा विश्वव्यापी मनाशी संबंध आहे. हा मुद्दा विशद करताना स्वामी विवेकानंदांनी फार नामी दृष्टांत दिलेला आहे. एखाद्या विशाल सागरावर ज्याप्रमाणे लहान-लहान लाटा सर्वत्र पसरतात, त्याचप्रमाणे विश्वव्यापी मनावर आपणां सर्वांची मने ही लहान लहान लाटांसारखी उटत असतात. अशा रीतीनं सर्व मनांचा परस्परांशी संबंध असल्यामुळे त्यातल्या विचारांचं परस्पर-संक्रमणही सहज होऊ शकतं. अनंत अस्तित्वाच्या महासागरावरील आपण लाटाचं आहोत.
या मानवी मनाच्या शास्रालाच योगशास्र म्हणतात. पार्यासारखं मानवी मन हा या योगशास्राचा प्रमुख विषय! मन या ओढाळ गुरुला ठाणबंद केल्यावर त्या मनाचं सामर्थ्य केवढं अपरंपार असतं ही गोष्ट याच शास्रानं दर्शवून दिली आहे. या शास्रातले मार्गदर्शक वाटाडे म्हणजे अष्टसिद्धी ! या अष्टसिद्धींच्या बळावर या यौजनाबद्ध विश्वात चमत्कार घडतात, आजवर घडत आलेले आहेत, यापुढेही घडतील. ज्या मनुष्याला स्वत:च्या मनावर ताबा ठेवण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं, त्या मानसाला इतरांच्या मनावरही ताबा ठेवता येतो. मनुष्यातलं पूर्णत्व व्यक्त करणं हीच या शास्राची खरी उपयुक्तता आहे.महान योगीपुरुषात हे मन:सामर्थ्य प्रकर्षानं प्रकट होत असतं. योगीपुरुष जोवर देह-अवस्थेत असतो तो पर्यंत चमत्कारांच्या रुपानं त्याचं हे मन:सामर्थ्य उजेडात येतं असतं. ज्या सिद्धींच्या बळावर योगीपुरुषाकडून हे चमत्कार अपापत: घडतात त्या सिद्धी त्या योगीपुरुषाच्या चरणी लोटांगण घेत असतात. योगीपुरुष त्या सिद्धींचा कदापि दास होत नाही, तर त्या सिद्धी त्याच्या दारी दास म्हणून नांदत असतात.
४…….. क्रमश: …….
जय गजानन !! आपल्या वेब साइट मधील भक्तांचे अनुभव हे सादर खूपच भारावून टाकणारे आहे.कृपया हे सदर बंद करू नका । ते खूपच प्रेरणादायी आहे .सध्या हे सदर दिसत नाहीये ।