“श्री ”
गजानन महाराज की जय (अनुभव 64🌺)
*सव्वा लाख मोदकांचा प्रसाद*
जय गजानन! श्री गजानन महाराजांनी आपल्याकडे जे कोणतं सेवा कार्य सोपविलं आहे ते करीत असताना, त्यांच्या भक्तीत रंगून जाऊन केलं,त्यांचं नामस्मरण करता करता केलं,तर त्या कार्यातील गोडी आणि परिणाम दोन्ही वाढीस लागतं,असं आता मनाला पटू लागलं आहे. अर्थात सर्व संतांनी हे सांगूनच ठेवलं आहे .पण आपण सामान्य माणसं!कधी काही थोडं विपरीत घडलं की आपण साशंक होतो,तर कधी एखादा चांगला अनुभव आला की मन लगेच प्रसनतेच्या झोक्यावर स्वार होतं.
गेली काही वर्षे झालीत,आम्ही नागपूरचे काही लोक अकोला-शेगांव पायी वारी आयोजित करतो आहोत. गेल्या वर्षी आम्ही पायी वारीत मार्गक्रमण करीत असताना आमच्या वारीत ‘वर्षा लक्षणे ‘ म्हणून एक भगिनी होत्या. त्या भजन म्हणत मार्गक्रमण करीत होत्या. त्यांना सहज म्हटलं वर्षाताई,अकोला ते शेगांव पूर्ण वेळ भजन म्हणत रहा आणि त्या खरोखरच पूर्ण वेळ गजानन महाराजांच्या भक्तीत रंगून गेल्या. त्या वेळी त्यांनी त्यांच्या सोबत एकवीस मोदक नैवेद्यार्थ घेतले होते. आनंदाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी समाधी मंदिरात पुजार्याने ते मोदक स्वीकारून वर्षाताईंना परमोच्च आनंद प्राप्त करून दिला. ते पाहून माझ्या मनात एक विचार चमकून गेला, आपण बर्यापैकी संख्येने मोदक शेगांवला आणले तर?
त्या विचारात रमलो आणि मनात आलं,अकरा हजार मोदक न्यावेत ,त्यासाठी दोन तीनशे लोकांशी संपर्क करून त्यांना एकवीस, एकावन्न मोदकांसाठी आवाहन केलं तर हे होऊ शकेल. प्रथम घरी सौ सोबत,कल्पना सोबत चर्चा केली,प्रथम ती म्हणाली,वाटतं तेव्हढं सोपं काम नाही आहे हे! मग तिला म्हटलं ठीक आहे,तू तुझ्यातर्फे एकवीस मोदक देशील?त्यावर ती म्हणाली
‘ अहो मी एकशे एक मोदक देणार!’ तिच्या त्या उत्तराने माझा उत्साह दुणावला. आमच्या गजानन परिवारात एक भावनाताई कन्हेरे आहेत,त्यांच्याकडे गजानन महाराज उपासना होत असते,त्या वारंवार गुरुवारी शेगांवला जात असतात,गजानन विजय पारायण करीत असतात. त्यांच्याजवळ बोललो तर त्या म्हणाल्या संजयदादा मी पाचशे एक मोदक देणार. अर्थातच महाराजांनी अकरा हजार मोदकांच्या संकल्पाला हिरवी झेंडी दाखविली आणि मी आमच्या गजानन परिवारातील मित्रांजवळ हा संकल्प व्यक्त केला.
आता प्रश्न होता हा विषय शेगांव संस्थानात संबंधितांच्या कानावर घालण्याचा ,नागपूरला श्री राहूल बोन्द्रे म्हणून असतात,शेगांवला भक्त निवासाच्या देणगीच्या निमित्ताने त्यांचा तिथे संबंध आलेला,त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. ते शेगांवला बोलले,बोलताना त्यांना वाटलं अकरा काय?महाराजांचा आकडा म्हणून एकवीस सांगावेत ते सांगून मोकळे झाले ‘आम्ही एकवीस हजार मोदक आणणार!’ आता आमची जबाबदारी दहा हजाराने अजून वाढली.
नागपूरला श्री. प्रफुल्ल पडोळे म्हणून महाराजांचे सेवक आहेत. त्यांच्याकडे दरवर्षी बुलडाणा जिल्हा मोताळा तालुका ‘जयपूर’ येथून महाराजांच्या पादुका येत असतात. त्या निमित्त त्यांच्याकडे झालेल्या मिटींगमधे मी मोदकांचा विषय मांडला,तेव्हा तिथे उपस्थित सर्वच भक्तांनी उत्साहाने तो विषय उचलून धरला आणि मोदक संख्या तेव्हाच एक्केचाळीस हजाराच्या घरात पोहोचली.
हल्ली व्हाट्सअॅप मुळे एखादी गोष्ट सर्वत्र झपाट्याने पसरते,त्यातून लोकांचा सहभाग वाढत गेला. शेवटी नागपूरात एकवीस ठिकाणी दि.25 ऑक्टोबरला मोदक एकत्रीकरणाचं काम होईल असं ठरलं,कारण 27 ऑक्टोबर 2018 शनिवार रोजी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर शेगांव येथे मोदक समर्पण करायचे ठरले होते. 26 ऑक्टोबर रोजी सर्व मोदक संकलन केन्द्रांवरून मोदक संकलन सुरू झालं. प्रत्येक केन्द्रावर मोठ मोठ्या खोक्यांमधून मोदक व्यवस्थित पॅकिंग करून तयार ठेवण्यात आले होते.
सर्व मोदकांमधून साखर खोबरं यांचं सारण असावं आणि ‘मोदक तळलेलेच असावेत ‘अशा सूचना देण्यात आल्या होत्या. एकूण एकशे सोळा मोठ्या आकाराचे पार्सलस् तयार झालेत. दि 26 ला टाटा चारशे सात गाडीच्या सहाय्याने आणि महाराजांचा सेवक म्हणून मंगेश कटनकर याने दिलेल्या सेवेतून मोदक गोळा करण्याचं काम पार पडलं .
दि. 26 ऑक्टोबर 2018 ला संध्याकाळी मोठी लक्झरी बस ठरलेल्या ठिकाणी आली. महाराजांचा प्रसाद जाणार म्हणून मोदक ठेवायची जागा,स्वच्छ धुवून,गोमुत्र सिंचन करून मनोभावे प्रार्थना करून सिध्द करण्यात आली. बसमध्ये काही भक्त गण बसले,कारण मोदकांसाठी जास्तीत जास्त जागा ठेवणं आवश्यक होतं. बस मोदकांसह नागपूरहून शेगांव साठी निघाली.
व्हाट्सअॅप मुळे आजूबाजूच्या गावात मोदक प्रसादाचं वृत्त पसरलं होतच,वाटेत कोंढाळी गाव लागतं. तेथील भक्तांनी तीन पार्सल मधून साडेतीन हजार मोदक आम्ही वाटेत बसमध्ये देणार हे सांगून ठेवलं होतं. आम्ही कोंढाळीला साडेसात पर्यंत अपेक्षित होतो,पण प्रत्यक्षात आम्ही तिथे पोहोचायला रात्रीचे अकरा वाजले,पण तेथील भक्त महाराजांवरील श्रध्देपोटी पूर्ण चार तास तिथे उभे राहून आमची प्रतिक्षा करीत होते. असेच मोदक अमरावती येथून देण्यात आले पण तिथे पोहोचेपर्यंत भरपूर उशीर झाल्यामुळे त्यांनी ‘बाबा ट्रॅव्हलस् ‘च्या बसने मोदक आमच्यासाठी शेगांवला रवाना केलेत.
या प्रासादिक प्रसंगात नोंद करण्यासारख्या काही गोष्टी घडल्या. ‘मानेवाडा’ भागातील सौ.लता मुकुंदवार यांच्या कडील संकलन केन्द्रावर सहा हजार मोदक संकलित झालेत तिथे सुलभा वालेकर यांच्या तर्फे मोदक देण्यात आलेत. त्यांचं काही दिवसांपूर्वी घरातच पडल्यामुळे हाताचा अंगठा आणि बाजूचं बोट दुखावलं होतं,त्यामुळे त्यात ताठरता आली होती. अंगठा आणि तर्जनीचं बोट वाकू शकत नव्हतं,म्हणून त्यांनी गावातच असलेल्या मुलीला मोदक करण्यात मदत करायला बोलावलं पण ती वेळेत येऊ न शकल्याने सुलभाताईंनीच मोदक करणं सुरू केलं आणि मोदकात सारण भरता भरता,त्यांच्या बोटांची हालचाल व्यवस्थित होऊ लागली. महाराज पावले!
नागपूरहून जवळच असलेल्या ‘ब्रह्मपुरी ‘गावातील एका भक्ताच्या गाडीत ए.सी. सुरू झाला की काही जळल्याचा वास येऊन,त्यांना ए.सी. लावता येईना. त्यांनी विचार केला की नागपूरला मोदक पोहोचवून देऊ आणि गाडी मेकॅनिकला दाखवून देऊ,,त्यांच्या गाडीतून तेराशे मोदक नागपूरला पोहोचले. गाडी घेऊन मेकॅनिककडे गेले, त्याने सर्व चेक केले,गाडीत काहीच दोष आढळला नाही. त्यानं सांगितलं बिनधास्त ए.सी. ऑन करा. मोदक प्रसाद पावल्याच्या आनंदात ते ब्रह्मपुरीला परतले.
खामगावला सौ. रमा अनील धूत राहतात,त्यांची पंधरा वीस वर्षांपासून शेगांवला मोदक नेण्याची इच्छा होती,पण आपले मोदक स्वीकारतील का ?या प्रश्नामुळे त्या फक्त महाराजांना प्रार्थना करून स्वस्थ होत्या .त्यांना मोदकांचं वृत्त कळताच त्यांनी एकटीनेच पाचशे एक मोदक करण्याची तयारी दर्शविली .दि. 27 ला सकाळीच त्या खामगावहून सोळाशे एकवीस मोदक घेऊन शेगांवला पोहोचल्या तेव्हा अनेक वर्षांची मोदक नैवेद्याची त्यांची प्रार्थना गजानन महाराजांनी ऐकल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता.
27 ऑक्टोबर 2018 ,शनिवार,संकष्ट चतुर्थी,मोदक समर्पणाचा दिवस. आम्ही आनंद विसाव्याच्या प्रांगणात आमच्या बस मधून सर्व पॅकिंग केलेले खोके (पार्सल) बाहेर काढले,एकूण सव्वाशे पेक्षा जास्त पार्सलस् अंगणात विखुरले. एक वेगळी सामानाची गाडी बोलावून सर्व मोदक मंदिराकडे रवाना झालेत. एकूण मोदकांची संख्या एक लाख पंचवीस हजार सहाशे पेक्षा थोडी जास्तच भरली. या शिवाय दोन तीनशे किलो पेढ्याचे मोदक आलेत ते वेगळेच. महाप्रसाद बारी कडे सर्व मोदक पोहोचले तेव्हा शेगांवच्या सेवेकर्यांसाठीही ती गोष्ट कुतुहलाची होती,कौतुकाची होती. हजारो भाविकांपर्यंत हा प्रसाद पोहोचणार होता.
आम्हा सर्व भक्तांना प्रत्यक्ष महाप्रसादालयात सेवा देण्याची संधी,प्रत्यक्ष मोदक वाटण्याची संधी आळीपाळीने प्राप्त झाली. भेट वस्तू दालनात श्री कुकडे यांच्या सहमतीने आम्ही अकरा भक्तांनी एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवून शांतपणे अथर्वशीर्ष म्हणून आनंद प्राप्त केला.
मी नागपूरला महाल विभागात वास्तव्याला असतो. माझं नाव संजय काळे,मी महाराजांचा एक सेवक,मोदकांचा प्रसाद अर्पण करून मंदिराच्या बाहेर आलो तेव्हा मला खूप गलबलून आलं. माझ्या मनातील अकरा हजार मोदकांच्या आकड्यात गजानन महाराजांनी
एक लाख अकरा हजार मोदकांची वाढ करवून, भक्तांच्या भावपूर्ण भक्तीला महाराजांचा सदैव आशीर्वाद असतो ही गोष्ट सिद्ध केली होती. मोदकांचा स्वीकार महाराज योग्य पध्दतीने करतील नं?या प्रश्नानी गेले बरेच दिवस माझ्या मनात घर केलं होतं,त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं होतं,अर्थात महाराजांच्या आशिर्वादाने आणि शेकडो भक्तांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतीने हे सर्व शक्य झालं होतं.
मी बाहेर येऊन मंदिराच्या कळसाकडे पाहिलं,,डोळ्यांतील आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. माझ्याबरोबर अनेकजण भाऊक झाले होते. अश्रू बाहेर पडणारे डोळे अनेक होते,पण त्या प्रत्येक थेंबाची कहाणी एकच होती,त्या कहाणीचं शीर्षक होतं …
श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव– संजय काळे, महाल नागपूर
शब्दांकन — जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..
🌸अवश्य वाचा- !!श्रीगजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या- 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त
……………,………………….,…..