शेगांवी चा गजाननला ऐहिक सुखाची कधिच लालसा नव्हती. ते परमहंस सन्यासी होते. त्यांना विटाळाची ही बाधा नव्हती. ऐन तारुण्यात ते सगूण म्हणजे देह अवतारात शेगांवात प्रगटले. त्या अगोदर पासून त्यांचे वास्तव्य होते.असे अभ्यासक सांगतात. असो, परमेश्वर सर्वत्र असतो, असे म्हणतात. परमेश्वर कोणी पाहीलंय महाराज तर सगूणात होते. हे तर आपल्याला मान्य करावे लागेल. माघ वद्य सप्तमी या दिवशी त्यांनी जनता जनार्धनाला दर्शन दिले. मात्र त्यावेळी त्यांच्या अंगी जुनी पुराणी एक बंडी होती. साधू, महंत, महाराज म्हटले की आपल्या सारख्या सामान्य माणसांच्या मनात काहीशी वेगळी प्रतिमा असते. भरजरी कपडे, दागदागिने, गाडी घोडा अशा आपल्या कल्पना. पण श्रीं चे राहणे, वागणे, बोलणे सारे काही निराळे. त्यांना भौतिक सुखाची आच नव्हती. सदैव दिगंबर अवस्थेत राहात. सारे सुख त्याच्या पायाशी लोळण घेत होते. सिद्धयोगी तो. योग सामर्थ्यावर ते काहीही करु शकले असते. पण त्यांनी साध्य शक्तीचा कधीच दूरूपयोग केला नाही. स्वतःवरही बंधने लादून घेणारा हा सत्पुष निरीच्छ वृत्तीचा होता. म्हणून तर बाबांची स्तुती करावीशी वाटते ती दासगणूंच्या ओवीतुन.नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राचीच्या बालरवीवत् वर्णन किती करावे.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com