निःस्पृहता किती असावी. हे संतांकडून शिकावे. रामदास स्वामी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईंबाबा, शेगांवीचे गजानन महाराज असे अनेक संत झाले. विरक्तीतून समाजहित जपणारे ते संत. त्यांना आवड ती खर्या भावभक्तीची. अकोल्याचे बच्चुलाल आगरवाल यांनी एकदा श्री गजाननाची मनोभावे सेवा केली. श्रींस वस्र अलंकार परिधान केले. आपल्या जवळ होते नव्हते ते सारं श्रींस अर्पण केलं. बच्चुलाल यांचा भाव शुद्ध होता. त्यांना राम मंदिर बांधायची इच्छा होती. स्वामींनी त्यांचा भाव ओळखला, जानकीजीवन तुझा हेतु पूर्ण करेल. असा आशीर्वाद दिला. मात्र अर्पण केलेल्या वस्र अलंकाराचा पूर्ण त्याग केला. त्यांना वस्र अलंकाराची आसक्तीच नव्हती. लक्ष्मण घूडेची दांभिकता आणि बच्चूलालांची सात्विकता. दोहोंसही त्यांच्या फळ मिळाले. घूडे कफल्लक झाला. मात्र बच्चुलाल यांची सात्विकता तेजाळली. श्रीराम मंदिर उभे राहिले. अकोला येथे हे मंदिर आजही पाहायला मिळते. सत्कर्माचे फळ चांगलेच मिळते. ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे थोर साचे ते साकल्ये वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य. दासगणू महाराजांनी श्रींचे यथार्थ वर्णन केले आहे. आपण किमान श्रींचे नाम तर घेऊयात. म्हणूयात, श्री गजानन जय गजानन, गणी गण गणांत बोते, श्रीराम जय राम जयजय राम, जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com