शेगांवचे गजानन महाराजांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले. त्यांचे भाग्य थोर. मग त्यांचे भक्त असोत अथवा नसोत. साधी कृतकर्म भोगायला आलेली माणसे असोत. श्रीं च्या करीता सारे सारखेच. तपस्वी पुरूष तो, तो कशाला सामान्यांच्या मायाजालात अडकेल. सर्व षड्रिपूंवर विजय मिळविलेला विजेता तो. तोही सत्याचीच पारख करणार. सहज नाम घेतले आणि स्वामी गजानन लगेच तुमच्या मदतीला धावून आले. असे कधीच घडणार नाही. प्रथम तुमच्यातली सात्विकता, विचारांची सकारात्मकता, स्वच्छ मन, इतरांच्या कल्याणाची इच्छा, विनम्रता, वाणीचा गोडवा, निरपेक्ष वृत्ती, निरक्षीर विवेक बुद्धि, मुखी श्रीं चे नामस्मरण असेल तरच महाराज दर्शन देतील. केवळ मुर्तीचे दर्शनाने काही क्षणांचे समाधान होईल. अर्थात मूर्ती दर्शन ही निर्गुण दर्शनाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. त्यासाठी मूर्ती दर्शन हे हवेच. पण मानस पुजेतुनही श्रीं चे दर्शन घडू शकते. नामस्मरणाने तर जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना हिच अवस्था येते. नावात देव दिसु लागतो. बाबांचेही तसेच आहे. पण बाबांच्या दर्शनासाठी अंतःकरणाची सात्विकता हवी. कारण, खर्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधनांहून तुकारामे केले वर्णन संतचरणरजाचे अभंगी. तो अभंग पाहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिताकारणे.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com