भक्तांना आलेले अनुभव – डाॅ. डी. एन. ठवळी, (गाडगेनगर, अमरावती)

भक्तांना आलेले अनुभव

डाॅ. डी. एन. ठवळी, (गाडगेनगर, अमरावती)

नागपूरला हे बी. ए. एम. एस. च्या शेवटच्या परीक्षेचा अभ्यास करत होते. त्यावेळी रामनवमीच्या उत्सवाला शेगावला जाण्याची त्यांना इच्छा झाली. पण तिथे जाण्याजोगी आर्थिक परिस्थिती नव्हती. त्या वेळी ते अभ्यासाबरोबरच होमिओपॅथीची प्रॅक्टीस करत असत. एके दिवशी संध्याकाळी बॅग घेऊन ते बाहेर पडले. एवढ्यात गणेश नारायणराव मोहोरे यांनी त्यांना वाटेतच शंभर रुपये दिले, आणखीही दोन ठिकाणांहून त्यांना दोनशे दहा रुपये मिळाले. शेगावला जाण्याचा मनोमन विचार करुनच ते त्या रात्री झोपी गेले. दुसर्‍या दिवशी दुपार २ते ५ फायनलचा पेपर होता. सकाळी उठून त्यांनी पूजापाठ केला; आणि गांधीनगरातल्या गणपतीच्या देवळात ते दर्शनासाठी गेले. डोळे मिटून त्यांनी प्रार्थना केली- प्रारंभी विनती करु गणपती विद्यादयासागरा ।… हेरंबा गजनायका गजमुखा भक्तां बहू तोषवी ॥… प्रार्थना झाल्यावर डोळे उघडले. त्यांना गणपतीच्या ठिकाणी गजानन महाराजांची मूर्ती दिसली.

     १९६० सालच्या दिवाळीपासून त्यांनी दवाखाना सुरु केला. ते गजानन महाराजांचं नाव घेऊनच औषधोपचार करतात. काॅलरा, नळसंग्रहणी वगैरे विकार ग्लूकोज, सलाईन देऊन बरे केले, पण महाराजांचं नामस्मरण करुनचं ! माहुली जहागीर येथे त्यांच्या दवाखाण्याची शाखा होती. तिथे आठरा वर्षाचा एक मुलगा विषमज्वरानं आजारी पडला. त्याची आई लहानपणीच वारली होती. बाप सकाळी भाकरी करुन शेतावर जायचा, डाॅ. ठवळी सकाळी त्याला औषध देऊन जायचे, पण गुण येईना. आजार विकोपाला जायला लागला. मग समजलं की, हा मुलगा वडीलांनी करुन ठेवलेली भाकरी खायचा आणि कुत्र्यानं भाकरी नेली म्हणून सांगायचा. मग डाॅक्टरांनी त्याला घरी नेऊन पथ्यपाणी केलं. शेवटी त्याला वात झाला. त्या भरात डाॅक्टरांच्या पत्नीला तो मुलगा शिव्या द्यायला लागला. नंतर त्याला हाॅस्पिटलमध्ये हलवलं. तिथल्या डाॅक्टरांनी जगण्याची आशा नाही म्हणून त्याच्या तोंडावर पांघरुण घालून ठेवलं. डाॅ. ठवळी यांनी त्या मुलाच्यि बापाला घरी जेवायला पाठवून दिलं आणि ते स्वत: महाराजांच स्तोत्र म्हणत मुलाच्या उशागती बसले. काही वेळानं रामदास सकसुळे यांनी आजारी मुलाच्या तोंडावरचं पांघरुण काढलं. मुलाने डोळे उघडले होते. तो बरा झाला होता.

     डाॅ. ठवळी यांच्या दवाखाण्याचं नाव आहे, “श्री गजानन क्लिनिक” दवाखाना गुरुवारी बंद असतो. पण कांही मित्रांच्या सांगण्यावरुन त्यांनी तो दिवस बदलून रविवारी दवाखाणा बंद ठेवण्याची प्रथा सुरु केली. पुढल्या गुरुवारी ते बाहेर पडून गाडीत बसायला जाणार एवढ्यात जुलाब-उलट्या सुरु झाल्या. लगेच त्यांनी आपल्या पत्नीला पारायणाला बसवलं. पाचसहा अध्याय झाले तोपर्यंत हातपायात गोळे यायला लागले. मित्रांच्या आग्रहाखातर दवाखान्यात नेलं. आराम पडेना. शेवटी दवाखाण्यातल्या मागच्या दारानं पाय काढला, आणि डाॅक्टर आपल्या पत्नीसह शेगावला गेले. लगेच त्यांना आराम पडला.

     १९६३ च्या ऋषिपंचमीला ते शेगावला पुन्हा गेले. देवळाच्या नंदीच्या बाजूला पोथीचं पारायण करायला बसले. डाव्या मांडीनंच त्यांना पारायण पुरं करायचं होतं. पण डोक्यावर भला मोठा ढग आला; आणि आश्चर्य असं की, एक फूट अंतरावर पाऊस पडून गेला. एका मांडीवर त्यांच पारायणं पुरं झालं. ते उठायला लागले, पण पायाला मुंग्या आल्यामुळे उठता येईना. त्याच वेळी एक वृद्ध गृहस्थ आला आणि त्यांच्या पायाचे त्यानं पटापट मुके घेतले. एकदम त्यांनी ऊठून आरती म्हणायला प्रारंभ केला. आरती झाल्यावर त्यांनी बघितलं. तो वृद्ध त्यांना दिसला नाही.

     १९६४ साली रामनवमीच्या वेळी शेगावच्या यात्रेला खूप गर्दी होती. डाॅक्टरांनी दरवाजाजवळ उभं राहून स्तोत्र म्हटलं. तिथे महाराजांनी त्यांना दर्शन दिलं.
श्री गजानन महाराजांचा एक भक्त.

डाॅ. डी. एन. ठवळी.

गाडगेनगर, अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.