श्रीमती रमाबाई गोळे, (द्वारा: सौ. शोभा रिसबूड, प्लाॅट नं. २०, समाधान, फ्रेंडस काॅलनी, राणा प्रतापनगर, नागपूर ४४००१०.)
रमाबाईंचे यजमान पुरुषोत्तम गोळे हे वर्ध्याला डाॅक्टर होते. त्यिंना तीन मुली व दोन मुलगे. त्यांचे यजमान ५ जानेवारी १९५३ रोजी वारले. त्यांचा मोठा मुलगा बी. काॅम. झाला. त्याला १९५५ च्या जानेवारीत नागपूरला ए. जी. आॅफिसमध्ये नोकरी लागली. रमाबाईंजवळ प्रथम महाराजांची पोथी नव्हती अगर फोटोही नव्हता. नागपूरला आल्यावर त्यांनी पोथी-फोटो मागविला. मुलाला नोकरी लागल्यावर रमाबाईंनी त्याला कपडे करण्याकरिता पंच्याहत्तर रुपये दिले. त्यानं ओळखीच्या शिंप्याकडे कपडे शिवायला टाकले पण दोन महिने झाले तरी तो कपडे देईना. मुलाला तर कपडे तातडीने हवे होते. एका गुरुवारी रमाबाईंनी देवाची पूजा केली. त्यावेळी त्यांना अतिशय वाईट वाटलं. ओढघस्त परिस्थितीत मुलाचे कपडे हातात मिळत नव्हते. त्यांनी देवाला प्रार्थना केली की, कपडे अगर कापड शिंप्याकडून परत मिळालं तर मी पोथीचं पारायण करीन. आश्चर्य असं की, त्याच शुक्रवारी त्यांना कपडे शिवून मिळाले. त्यांनी पारायण केलं.
त्यांची थोरली मुलगी सिंधू तिला नोकरी मिळत नव्हती, त्यांनी पारायण केलं, समाप्तीच्या दिवशी नोकरीच बोलावणं आलं…. तिचे दिवस भरले होते. रमाबाईंना काळजी वाटू लागली. मुलीचे यजमान पारायणाला बोलले. सुलभ प्रसूती होऊन मुलीला मुलगा झाला. बाळांतपणानंतर दुधाची गाठ झाली. पण पारायण केल्यावर गाठ फुटली, आणि सारं व्यवस्थित झालं. तिचा मुलगा प्रसाद, त्याला १९५७ सालच्या मे महिन्यात भयंकर ताप आला, त्यावेळी घरातल्या प्रत्येकान पारायण केलं, मुलगा तापातून बरा झाला.
त्यांची हीच मुलगी सिंधू रिसबूड हिनं प्लाॅट घेण्याचा विचार केला. त्यात मध्यस्थानं सहाशे रुपये आगाऊ मागितले, पण ते पैसे त्याने बुडवले. प्लाॅट न मिळता पैसे बुडाले म्हणून रमाबाईंना फार वाईट वाटलं, त्याच दिवशी रात्री त्यांना स्वप्न पडलं, एका मोठ्या वाड्याच्या दिंडीजवळ त्या उभ्या होत्या. दाराच्या फटीतून त्यांनी बाहेर बघितलं. त्यांना दोन सत्पुरुष दिसले. एक दिगंबर आणि दुसरा शुभ्रवस्र परिधान केलेला ! त्यांच्या मागच्या बाजूला लखलखीत प्रकाश होता. रमाबाईंनी नमस्कार केला. दिगंबर सत्पुरुष घरात आला, म्हणाला, मी पाठीशी होतो म्हणून तुम्ही थोडक्यात बचावलात. रमाबाई त्या पुरुषाला म्हणाल्या, मुलांना वडील नाहीत, तेंव्हा आपण असेच पाठीशी राहा. रमाबाईंनी हात पुढे केला, त्यांनी तीर्थ दिलं. त्यांच्या मनात आलं, महाराजांनी तीर्थ दिलं, पण प्रसाद दिला नाही ! सहज म्हणून त्यांनी मागं वळून बघितलं त्यांना देव्हार्यात नर्मद्या गणपतीजवळच तांबडा त्रिकोणी दगड ठेवलेला दिसला. त्यांनी महाराजांना नमस्कार करायला मुलीला सांगितलं. ती आली. महाराज लगेच उठले. त्यांच्याजवळ महाराजांचा चिलीमवाला फोटो होता. रमाबाई म्हणाल्या, अगबाई, यांच्याजवळ गजानन महाराजांचा फोटो आहे. लगेच ते उठले आणि निघून गेले, जाताना म्हणाले, जे काही कराल ते मला आधी सांगत जा. ते गर्दीत दिसेनासे झाले. रमाबाईंच्याजवळ गजानन महाराज आणि साईबाबा या दोन्ही सत्पुरुषांचे फोटो आहेत.
श्री गजानन महाराजांचा एक भक्त.
श्रीमती रमाबाई गोळे.
द्वारा: सौ. शोभा रिसबूड, प्लाॅट नं. २०, समाधान फ्रेंडस काॅलनी, राणा प्रतापनगर, नागपूर ४४००१०.