भक्तांना आलेले अनुभव
मुरलीधर रामकृष्ण मार्के, (पांडुरंग सदन, आनंदनगर, सिंहगड रस्ता, पुणे-४११०५१.)
मुरलीधर मार्के यांच्या पत्नी सौ. सरोजताई या दि.२५ सप्टेंबर १९७७ रोजी प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला.मुलाचं वजन आठ पौंड होतं. परंतु मुलाच्या आईच्या अंगावर दूध नसल्यामुळे मुलगा प्यायचा नाही. त्याची प्रकृती खालावत चालली. ५ आॅक्टोबरला मुरलीधरपंतांची आई सुनेच्या बाळांतपणासाठी पुण्याला आली. सौ. कौसल्याबाईंना सारी हकीगत समजली. लगेच दोन दिवसांनी त्यांनी सगुण बघितला. शेगावच्या गजानन महाराजांचं नाव निघालं. लगेच कौसल्याबाईंनी त्यांच्या फोटोसमोर हात जोडून सांगितलं, बाळाच्या आईला अंगावर दूध आलं आणि मुलगा प्यायला लागला तर शेगावला येऊन तुझ्यासमोर दुधाचे पाच हंडे आणून देईन. मुलाचं जावळही देईन. सगुण बघायच्या वेळेला नारळ फोडून पेढे वाटीन. सौ. सरोजताईंनी गुरवारचा उपवास आणि पोथीचं पारायण करायचं कबूल केलं.
परंतु सगुण पाहिल्यानंतर चार-पाच दिवस असेच निघून गेले शेवटी सरोजताई कंटाळल्या. महाराजांच्या फोटोसमोर उभं राहून त्यांनी सांगितलं, मी गुरुवारचा उपवास करते आहे, तो आता सोडून देते… लगेच कोजागिरी पौर्णिमेपासून त्यांच्या अंगावर दूध यायला लागलं. मूल पिऊ लागलं, त्याची प्रकृती सुधरु लागली.
मुरलीधरपंतांचे सासरे देविदास धिवे. मोटार मेकॅनिक म्हणून मुंडगावी नोकरीला होते. त्यावेळी मुरलीधरपंतांच्या सासूबाईंची आणि पुंडलिक भोकरे यांची भेट झाली. त्यांनी सासूबाईंना गजानन महाराजांची पोथी दिली आणि रोज एक अध्याय वाचायला सांगितला. मुरलीधरपंतांच लग्न झाल्यावर ती पोथी सौ. सरोजताईकडे आली… आता मार्केमंडळी ती पोथी वाचतात. त्यांना अनुभवही खूप येतात….मुंडगावला भंडारा होता, त्यावेळी पुंडलिक भोकरे महाराज आजारी पडले. त्यांच्या घरी श्रीगजानन महाराजांचा फोटो होता. भोकरे महाराज आजारी पडले त्यावेळी गजानन महाराजांच्या फोटोला घाम फुटला होता. हे दृश्य स्वत: मुरलीधरपंतांच्या सासूबाईंनी बघितलेलं होतं. मुरलीधरपंतांची मेव्हणी सौ. नलिनी सोमवंशी ही मुंडगावला असताना आजारी पडली होती. तीची प्रकृती गंभीर झाली. तिला दमणीतून अकोटला नेण्यात आलं. वाटेत एका माणसानं बैलांचे कासरे धरुन गाडी थांबवली. त्यांना तिथे श्रीगजानन महाराजांचा भास झाला. अकोटला गेल्यावर महाराजांच्या कृपेनं तिची प्रकृती बरी झाली.
श्री गजानन महाराजांचा एक भक्त.
मुरलीधर रामकृष्ण मार्के.
पांडुरंग सदन, आनंदनगर, सिंहगड रस्ता, पुणे-४११०५१.