​भक्तांना आलेले अनुभव-सौ. सुलभा देशमुख, (मुख्याध्यापिका, शासकीय कन्याशाळा क्र. १, शेगाव, विदर्भ.) 

भक्तांना आलेले अनुभव
सौ. सुलभा देशमुख, (मुख्याध्यापिका, शासकीय कन्याशाळा क्र. १, शेगाव, विदर्भ.) 

सो सुलभाताई शेगावला बदलून येण्यापूर्वी त्या बाळापूरला सहशिक्षिका होत्या. बाळापूरला असताना त्यांचा देवधर्माकडे फारसा ओढा नसे. लहान-लहान मुलींनाघरात एकट्यांना ठेवून शाळेत जाताना त्यांना अतिशय वाईट वाटायचं, पण इलाजच नव्हता. कारण मुलांकडे बघणारं घरात कुणीच नव्हतं. एकदा त्यांना अशीच काळजी लागली असताना त्यांना स्वप्न पडलं. दारातून कुणीतरी नग्न पुरुष आत डोकावून पाहात होता. त्या भीतीनं ओरडल्या, वेडा आला वेडा आला !…. दुसर्‍या दिवशी सुलभाताईंनी ही हकीगत आपल्या पोक्त वयाच्या मुख्याध्यापिकेला सांगितली.त्या म्हणाल्या, अगं ते गजाननमहाराज होते. तू त्यांना ओळखल नाहीस. त्या दिवसापासून सुलभाताईंच्या शेगावच्या वार्‍या सुरु झाल्या.

     हळूहळू गजाननमहाराजांविषयीची भक्तिभावना वाढीला लागली. सुलभाताई घरात एकट्याच असल्यामुळे सोवळं-ओवळं पाळणं त्यांना शक्य नव्हतं. म्हणून महाराजांना त्या शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य कधीच दाखवत नसतं. शेंगादाणे, खडीसाखर, दूध, खोबरं अशाच वस्तूंचा नैवेद्य दाखवत. एकदा स्वप्नात त्या आणि मुली जेवत बसल्या होत्या. एवढ्यात शेजारचा लहानसहान कामं करणारा मुलगा मनोहर तिथे आला होता, आणि त्यानं विचारलं, मी जेवायलं येऊ का ? सुलभाताईंनी हो म्हटल्याबरोबर तो जेवायला बसला. तो म्हणाला, एवढं अन्न आपल्या सर्वांना पुरेल का ? सुलभाताई म्हणाल्या, पुरून उरेल. तू कशाला काळजी करतोस ? कमी पडलं तर पुन्हा करुन वाढीन. पोटभर जेव. जेवता जेवताच त्याच्या अंगावरचे कपडे हळूहळू घसरायला लागले. सुलभाताई ओरडल्या, अरे हे काय आहे रे ? अरे मन्या असं काय करतोस ? तो उठून उभा राहिला आणि मन्याच्या जागी पूर्ण नग्न पुरुषाची प्रतिमा सुलभाताईंना दिसली. त्या घाबरुन ओरडल्या, वेडा, वेडा ! त्या जाग्या झाल्या त्यांना कुणीच दिसलं नाही…. दुसर्‍या दिवशी शाळेत गेल्यावर त्यांनी मुख्याध्यापिकाबाईंना हे स्वप्न कथन केलं, त्या म्हणाल्या, तू इतके कडकडीत उपवास करतेस आणि देवाला खडीसाखर, शेंगदाणे खाऊ घालतेस. हा नैवेद्य खाऊन त्याला वीट आला. म्हणून महाराज तुझ्या हातचा  अन्नाचा नैवेद्य घ्यायला आले होते, आणि तू त्यांना वेडा म्हणालीस. तरी बरं या वेळी ते तुझ्या ओळखीच्या मन्याच्या रुपानं आले होते… पण तू त्यांना ओळखलं नाहीस. त्याच वेळी तू त्यांचे पाय का धरले नाहीस ? तुझ्या जन्माचं सार्थक तरी झालं असतं.

     तेंव्हापासून सुलभाताईंना महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली. त्यातच १९६१ साली त्यांची बदली शेगावला झाली. शेगावला आल्यावर गुरुपुष्यामृत, दोन्ही चतुर्थ्या, दशमी, एकादशी, व्दादशी या तिथींना श्री गजानन-विजय या पोथीची मंदिरात जाऊन एकाच बैठकीत पारायणं करु लागल्या. महाराजांच्या कृपेनं आपल्यावरची संकटं दूर होतात अस त्यांना वाटू लागलं. शेगावला असतानाच १९६६ साली त्यांची वरच्या जागेवर बदली झाली. १९७४ साली अधिक श्रावणातल्या सोमवारी रात्री बाराच्या सुमारास त्यांना महाराजांचं दर्शन घडलं. सुलभाताई पुस्तकाचं कपाट आवरत असताना मुली नित्याप्रमाणे बाहेर व्हरांड्यात होत्या. त्या सांगू लागल्या, तुझ्याकडे कुणीतरी आलयं. सुलभाताईंनी मुलींना सांगितलं, त्यांना आत पाठवं, ते गृहस्थ दारात येऊन उभे राहिले. पायात खडावा, कमरेला भगवी लुंगी, अंगात रामदासी पद्धतीचा भगवा सदरा, डोक्याला मोठा भगवा फेटा, गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळावर गंधाचा मोठा टिळा, कानात रुद्राक्ष, मुद्रा अतिशय तेजस्वी अशी ती मूर्ती पाहताच सुलभाताईंनी साष्टांग दंडवत घातले. “भगवंता, आज मी धन्य झाले” असे उदगार त्यांच्या तोंडातून निघाले…. त्या पुरुषानं सुलभाताईंना उठवल्याचा भास झाला. मुलींना उद्देशून त्यांनी सांगितलं, दूध आणा, केळी आणा एवढ्यात ते अंतर्धान पावले… थोड्याच दिवसांनी त्यांच्या एका मुलीचं लग्न विनासायास पार पडलं. नंतर १९७५ साली ५ सष्टेंबरला सुलभाताईंना राज्यपुरस्कार मिळाला. मग दुसर्‍या मुलीचंही लग्न १९७५ साली असच विनासायास पार पडलं. दोन्ही मुली सुस्थितीत आहेत…. सुलभाताईंकडे राबता मोठा आहे. आल्या-गेल्याचं अतिथ्य त्या मनोभावे करतात, हे सारं गजानन महाराजांच्यामुळेच शक्य होतं अशी त्यांची श्रद्धा आहे.
श्री गजानन महाराजांचा एक भक्त

सौ. सुलभा देशमुख

मुख्याध्यापिका, शासकीय कन्याशाळा क्र. १, शेगांव, विदर्भ

2 thoughts on “​भक्तांना आलेले अनुभव-सौ. सुलभा देशमुख, (मुख्याध्यापिका, शासकीय कन्याशाळा क्र. १, शेगाव, विदर्भ.) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.