​भक्तांना आलेले अनुभव – सौ. संजीवनी खेर, (आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे ५१. फोन ४३५८२५८.)

भक्तांना आलेले अनुभव
सौ. संजीवनी खेर, (आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे ५१. फोन ४३५८२५८.)
माझ्या सासूबाई आनंदी काकू यांच्या कृपाप्रसादामुळे शेगावचे महासंत श्रीगजानन महाराज यांचं आमच्याशी नातं जडलं, ते कायमस्वरुपी झालं. सासूबाईंना आम्ही रोज “श्रीगजानन विजय” ही पोथी वाचून दाखवत असू. त्यांच्याचमूळे आमच्या घरी रोज संध्याकाळी महाराजांची आरती सुरु झाली. ती आजही अव्याहतपणे सुरु आहे. १९७८ साली आॅगस्ट महिन्यात सासूबाईंच निधन झालं. त्यावेळेपर्यंत त्यांच्या समोरच्या भिंतीवर महाराजांचा फोटो उंचीवर टांगलेला होता. सासूबाईंना सतत दर्शन व्हाव म्हणून ! फोटो उंचावर लावलेला असल्यामुळे मला त्या फोटोची पूजाअर्चा करता येत नसे. सासूबाई गेल्यावर तो फोटो देवघरात ठेवून त्याची पूजा करण्याची मला उत्कट इच्छा झाली.

     एके दिवशी दुपारी आम्ही हाॅलमध्ये महाराजांच्या गप्पागोष्टी करत बसलो होतो. वारा पुरता पडला होता. त्यामुळे उकाडा वाढला होता. एवढ्यात आतल्या बाजूला मोठा आवाज आला. महाराजांचा फोटो वरुन खाली पडला होता हे आम्ही ओळखलं. फोटोची काच फुटली असणार हे न सांगताही समजण्यासारखं होतं.

     फोटोच्या फुटलेल्या काचा गोळा करण्यासाठी मी आत गेले. फोटो पालथा पडला होता. काचा इतस्तत: पसरु नयेत म्हणून मी फोटो अलगद उचलला. तो काय आश्चर्य ! आठ फुटावरुन पडलेल्या फोटोची काच जशीच्या तशी होती. तो प्रकार पाहून आम्ही सर्वजन आश्चर्यचकित झालो. रोज महाराजांची पूजाअर्चा करण्यासाठी तो फोटो देवघरात ठेवण्याची माझी उत्कट इच्छा महाराजांनी अशा तर्‍हेने पूर्ण केली.

     सासूबाईंच्या इच्छेनुसार आम्ही आमच्या घराच्या बाहेरच्या ओट्यावर महाराजांचं एक छोटस टुमदार देऊळ बांधलं आहे. महाराजांच्यासमोर कुणीही पैसा ठेवायचा नाही तर फक्त भाव ठेवायचा असा आमचा दंडक आहे. मात्र काही लोक श्रद्धापूर्वक आपल्या काही कामांना महाराजांसमोर बोलतात.त्यांची ती कामना पूर्ण झाली म्हणजे आम्ही महाराजांसमोर नारळ फोडतो; आणि त्या व्यक्तीला प्रसाद देतो. असे अनेकदा अनुभव आलेले आहेत. आमचे भक्तवत्सल श्रीगजानन महाराज लोकांचे मनोगत पूर्ण करतात एवढाच आमचा लेखी परमानंद !
श्री गजानन महाराजांचा एक भक्त.

सौ. संजीवनी खरे.

आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे ५१. फोन ४३५८२५८.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.