भक्तांना आलेले अनुभव – श्रीकृष्ण व्यास, (द्वारा: सेठ जानकीदास मोहता जिनिंग फॅक्टरी, हिंगणघाट, जि. वर्धा.)
१९६८ सालच्या मे महिन्याच्या प्रारंभी श्रीकृष्ण व्यास हे महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला गेले. उतरल्यावर त्यांनी स्नान केलं. स्नानाला जाताना बनियनच्या खिशात त्यांनी चारशे रुपये, दोन अंगठ्या, गळ्यातला गोप, घड्याळ, चष्मा, चिल्लर आणि किल्ल्यांचा जुडगा हे जोखमीचं सामान ठेवून दिलं. वर टाॅवेल आणि कपडे ठेवले होते. जवळच नळावर ते स्नानाला बसले. गर्दी खूप होती. स्नान केल्यावर ते टाॅवेल घ्यायला आले. बघतात तर सारं सामान गायब होतं. ओलेत्यानं ते अंडरपॅन्ट घालून उभे होते. त्यांनी खूप आरडाओरडा केला. काही लोक हसायला लागले. काहींनी सहानुभूती दाखवली. पण कांहीच उपयोग नव्हता. एवढ्यात एक रिक्षावाला आला आणि म्हणाला, तुम्ही घाबरु नका, एवढ्यातच तीन माणसांनी एका रिक्षावाल्याला जास्त पैसे दिले आणि ती माणसं गडबडीनं निघून गेली. तुम्ही ताबडतोब चला. मी त्यांना पकडून देतो. श्रीकृष्ण व्यास त्या रिक्षावाल्याला म्हणाले, अरे तू मला रिक्षात घेऊन जाशील, पण पैसे कुठले देऊ ? रिक्षावाल्यानं तसच नेण्याचं आश्वासन दिलं. देवळाच्या मार्गावर एक विहीर आहे, त्या विहिरीजवळ ती तीन माणसे बसली होती.रिक्षावाल्यानं ओळखलं. सारा माल सापडला. पोलीस बरोबर होताच. पोलिसानं त्या तीन माणसांना ताब्यात घेतलं. महाराजांच्या कृपेनं हा सारा माल सापडला म्हणून व्यासांनी महाराजांना शतश: धन्यवाद दिले.
श्री गजानन महाराजांचा एक भक्त.
श्रीकृष्ण व्यास.
द्वारा: सेठ जानकीदास मोहता जिनिंग फॅक्टरी, हिंगणघाट, जि. वर्धा.