माझा यजमान भीमातटी उभा विटेसी जगजेठी तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे. शेगांवच्या गजानन महाराजांची ही वाणी. इतक्या विरक्त वृत्तीचे महाराज. साहजिकच तितक्याच विरक्त वृत्तीचे त्यांचे परम भक्त होते. त्यांना फक्त गजानन ईश्वराशी एकरूप व्हायचे होते आणि तसे त्यांनी करवून दाखविलेही. म्हणून तर स्वामींचे खरे भक्त आजही सर्वार्थाने पुजनीय आहेत. पितांबर शिंपी यांना तर अंगावर नेसायला वस्र नव्हते. एकदा श्रीं नीच स्वतः चे वस्र त्यांना नेसायला दिले. परंतू टिकाखोरांनी त्याचेच भांडवल केले. पितांबराचा पावलोपावली अपमान केला. अखेर नेसलेले वस्र सोडून जुने नेसुन ते तेथून निघून गेले. टिकाकारांना वास्तविक काही अधिकार नव्हता. पितांबर महाराजांची भक्ती निर्मळ होती. अंतरीचा भाव स्वच्छ व पवित्र होता. म्हणून गजाननाचे अभय त्यांच्या पाठीशी होते. सांगायचे तात्पर्य परमार्थ, सेवाभाव, भक्ती ही सोपी गोष्ट नाही. टिकाकार टिका करीतच राहतात. सार्वजनिक क्षेत्रात तर भक्त म्हणवणार्यांमध्ये तु श्रेष्ठ की मी श्रेष्ठ. मी योग्य अन् तू अयोग्य अशी चढाओढ लागलेली पाहायला, ऐकायला, अनुभवायला मिळते. तथाकथीत टिकाकार एकमेकांची उणीधुणी काढत बसतात. हा भक्तीचा बाजार नव्हे का? सार्वजनिक असो की व्यक्तीगत असो. श्रद्धा भक्ती निर्मळ असावी. विनाकारण एकमेकांची अवहेलना करून काय साध्य होणार?. महाराज एका बाजूला आणि सेवेला एकत्र येणारे एकमेकांमध्ये वादविवाद करणारे. हे चित्र काही योग्य नाही. शेवटी परमेश्वरही सत्याचीच बाजू घेतो. महाराज सदैव पितांबर महाराजांच्याच पाठीशी राहिले. टिकाकारांकडे लक्ष देऊ नये. त्यापेक्षा आपले श्रीं चे नामस्मरण करावे. पितांबर महाराजांसारखी भक्ती आणि सेवा असावी.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com