निखळ मैत्री, पवित्र नाते आणि सद्विचारांचा सन्मान करणारे शेगांवचे श्री गजानन महाराज खरे समाजसुधारक आणि प्रबोधनकार. बायजा आणि पुंडलिक भोकरे यांच्या पुर्वजन्मीचे नाते श्रींस माहिती होते. दोघा बहिण भावाचा त्यांनी सन्मानच केला. दोघांची अंतःकरणेही शुद्ध पवित्र होती. पुंडलिकासी पाहून बोलू लागले दयाघन की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका. लोक निंदा जरी करिती तरी अंतर न द्यावे इजप्रती दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भुले आपुल्या पोरीस लावू नको भलता दोष ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मींचे. शिवाय या बायजाला कोठेही न नवरा भला ही न आली करायाला संसार मुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जन्मभरी जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिली गे. तिने नामदेव गुरू केला ही शरण आली आम्हाला माझ्या जनाबाईला कोणी न आता छळावे. त्या दिवसापासून बायजाबद्दल कोणीच काही बोलले नाही. बायजा श्रींच्या भक्तीत रममाण झाली. सांगायचे तात्पर्य हे की आजही समाजात अशी पवित्र नाती जपणारी मंडळी आहेत. मात्र त्यांच्याविषयी बोलताना विचारपूर्वक बोलायला हवे. त्याकरीता पाहिजे सकारात्मक दृष्टीकोन. तो येईलही. त्यासाठी देखील हवी जोड नामस्मरणाची. म्हणून तर म्हणूयात, श्री गजानन जय गजानन, गणी गण गणांत बोते, श्रीराम जयराम जय जय राम, जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com