भक्तांना आलेले अनुभव – चंद्रशेखर व्यं. वराडपांडे (श्री गजानन महाराज मंदिर, रेशीमबाग, नागपूर-९.)

चंद्रशेखर व्यं. वराडपांडे (श्री गजानन महाराज मंदिर, रेशीमबाग, नागपूर-९.)
चंद्रशेखर वराडपांडे हे १९४८ च्या डिसेंबर महीन्यात वद्यातल्या एकादशीला शेगावच्या वारीला गेले. श्री गजानन-विजय या ग्रंथाचं पारायण आटोपलं. तिथेच महाराजांच्या देहविसर्जन स्थळाजवळ श्री पुंडलिकबाबा भोकरे बसले होते. देवस्थानात दाण्याच्या उसळीचा प्रसाद घेत असताना वराडपांडे यांना पुंडलिकबाबा म्हणाले, इथून जवळच नागझरी आहे. तिथे गोमाजीबुबा आहे. दर्शन घेऊन ये…. देवस्थानच्या उत्तरव्दाराजवळ काही मानसं बसलेली होती. त्यांनी हातांनी खुणावून नागझरीचा मार्ग सांगितला. परतु शेगावातल्या वळणाच्या रत्याने जाताना वराडपांडे यांना दिशेचा विसर पडला आणि रेल्वेमार्गाच्या बाजूनं ते थेट जलंबच्या दिशेने जायला निघाले. दीड-दोन मैल गेल्यानंतर एका म्हातार्‍यानं त्यांना हाक मारली. त्या म्हातार्‍याच्या अंगावर फक्त लंगोटी होती. हातात एक काठी आणि पायात टायरच्या चपला होत्या. वरापांडे त्या म्हातार्‍याजवळ गेले, तो म्हातारा म्हणाला, “तू पारायण केलं ना गजाननबुवाच्या पोथीचं ? मग पेढ्याचा परसाद दे की ! वराडपांडे यांनी पिशवीतून पेढे काढून त्याच्या हातावर ठेवले आणि सांगितलं, मला नागझरीला जायचं आहे.
तेव्हा तो म्हातारा हसला आणि म्हणाला, अरे भल्या माणसा, नागझरी हकडंकुकडं… थे तकडं राह्यली. असं म्हणून त्यानं वराडपांडे यांना समोर चालण्याची खूण केली. वराडपांडे पुढे आणि तो म्हातारा गृहस्थ मागे असं जात असताना त्या म्हातार्‍यानं वराडपांडे यांना बरेच प्रश्न विचारले. तेवढ्यात मालगाडी आली आणि त्या आवाजात त्या म्हातार्‍याचं बोलणं ऐकू येईनासं झालं. मालगाडी निघून गेल्यावर वराडपांडे यांनी मागे वळून बघितलं. मागून कुणीच येताना दिसलं नाही. समोर मात्र मंदिराचं शिखर दिसलं होतं. ते नागझरी गाव होतं. श्रीगोमाजीमहाराजांच दर्शन घेऊन वराडपांडे यांनी रात्री नागझरीला मुक्काम केला. त्यावेळी त्यांच्या स्वप्नात गजाननमहाराज आले आणि म्हणाले, भेटले ना गोमाजीबुवा ? दुपारी भेटलेला म्हातारा हे गजाननमहाराजच होते याबद्दल वराडपांडे यांची खात्री झाली.
एकदा वराडपांडे शेगावच्या वारीला गेले असताना त्यांना महाराजांचे परमभक्त बापुना काळे भेटले. रात्री वराडपांडे यांनी मठातच मुक्काम केला. रात्री समाधीपाशी जाऊन त्यांनी प्रार्थना केली, महाराज, आपल्या चरित्रावर काव्यरचना व्हावी अशी प्रेरणा द्यावी. रात्री महाराज जरीची शाल पांघरुन त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, “काव्यरचना करण्याचं स्फूर्तिस्थान आहे पंढरपूर ! दासगणूकडे जा.”
दुसरे दिवशी वराडपांडे परस्पर पंढरपूरला गेले. सतकवी दासगणू यांना नमस्कार करताच ते उदगारले, “श्री गजाननमहाराजांच्या कृपेने गीतगजानन तुझ्या हातून पूर्ण होईल.” वराडपांडे यांनी लिहिलेल्या त्या काव्यसंग्रहाला त्यांनी “गीतगनानन” हेच नाव दिलं.
१९६३ च्या माघ महिन्यात लता मंगेशकर यांच्या भगिनी मीना मंगेशकर यांचा विवाह कोल्हापूरला होणार होता, त्यासाठी ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या निमंत्रणावरुन वराडपांडे कोल्हापूरला जात होते. नागपूरहून ते निघाले तेव्हा त्यांच्या बरोबर गजाननभक्त शाम फडणास यांच्या पत्नी सौ. मंदा फडणीस याही होत्या. संध्याकाळी सहा वाजता नागपूरहून मुंबई मेल निघाली. रात्री आठ वाजताच, आपण फराळ आटपून घेऊ असं सो. मंदा फडणीस म्हणाल्या. वराडपांडे म्हणाले शेगाव येऊ दे. मग काय खायचं ते खाऊ ! हे त्यांच बोलणं डब्यातल्या सहप्रवाशांनी ऐकलं. ते म्हणाले शेगाव आल्यावर विशेष काय होणार आहे हो ? वराडपांड्यांनी उत्त दिलं, तसं विशेष कांहीच नाही. शेगाव स्टेशनवर कुणी मठामध्ये जाणारं दिसलं तर त्याच्याजवळ पेढ्याची पुडी आणि हार देईन. म्हणजे मग मला समाधानानं अन्न घेता येईल. वर्ध्याहून आलेले बावनकुळे हे वराडपांडे यांच्याजवळ बसले होते. ते म्हणाले, ज्या व्यक्तीला तुम्ही पेढे, हार द्याल त्या व्यक्तीला तुम्ही माझे एवढे चार आणे द्याल का ? इतरही प्रवाशांनी दहा पैसे, पाच पैसे वराडपांडे यांच्याजवळ दिले. वराडपांडे यांनी हातरुमालात पैसे ठेवून दिले. रात्री ११ वाजता शेगाव स्टेशन आलं. वराडपांडे यांचा डबा प्लॅटफार्मच्या बाजूला थांबलेला दिसला. ते लगबगीनं डब्याखाली उतरले. बावनकुळेही त्यांच्या मागोमाग धावले. थंडीमुळे प्लॅटफाॅर्मवर तिकिट-तपासनीस आणि पोर्टर यांच्याशिवाय कुणीच नव्हतं. गार्डानं शिटी दिली. आपले हार, पेढे आणि लोकांचे दिलेले पैसे मठात नेऊन द्यायला कुणीच भेटलं नाही, म्हणून वराडपांडे यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं एवढ्यात गाडीच्या दोन डब्यांच्या जोडातंन धूर आला. वराडपांडे यांना तेथे एक काळीशार उंच दिगंबर मूर्ती दिसली. त्या माणसाच्या पायात खडावा होत्या. चिलीम ओढत ती व्यक्ती प्लॅटफाॅर्मवर आली. वराडपांडे उत्सुकतेनं त्या मानसाजवळ जिऊन म्हणाले, बाबा ! बरं झालं तू तरी भेटलास भिकारी ! हे माझे हार-पेढे आणि लोकांनी दिलेले पैसे मठात पोचवून देशील ? तो भिकारी म्हणाला ! छट, मला वेळ नाही. वराडपांडे म्हणाले, बाबा ! नको जाऊस मठात ! तूच हे सारं घे; गजाननमहाराजांना ते पावलं असं मी समजेन. हे ऐकताच त्या भिकार्‍यानं त्यांच्या हातातून हाराचा पुडा घेतला आणि हार स्वत:च्या गळ्याभोवती गुंडाळून घेतला. पेड्यांची पुडी घेतली त्यातला एक पेढा वराडपांडे यांच्या हातावर ठेवला बाकीचे पेढे तोंडात टाकले. वराडपांडे यांनी पैसे सरळ त्याच्या हातावर ओतले, ते त्या भिकार्‍याने आपल्या कमरेला खोचले. त्याच हातानं त्यानं वराडपांडे यांच्या डोक्यावर थप्पड मारली आणि म्हणाला, “बस्स ? झालं समाधान ?” बावनकुळे हसले म्हणाले, अहो वराडपांडे, एका भिकार्‍यानं, तुमचा इतका अपमान केला तरी तुम्ही गप्प आहात !” तोपर्यंत भिकारी प्लॅटफाॅमच्या बाजूला असलेल्या तिसर्‍या पायरीपर्यंत जाताच अदृश्य झाला. बावनकुळे यांना त्यांच्या प्रश्नाचं परस्परच उत्तरं मिळालं. एवढ्यात तिथे काळा कोट घातलेले तिकिट तपासनीस आले आणि उदगारले, “अहो, हे गजाननमहाराजांच्या गावचं स्टेशन आहे. इथे अधूनमधून आपल्या भक्तांना कुठल्याही स्वरुपात येऊन ते दर्शन देऊन जातात. पुढे हा वृतांत डब्यातला इतर प्रवाशांना समजला तेव्हा ते थक्क झाले. मीना मंगेशकरांचा विवाह झाल्यावर वराडपांडे पंढरपूरला गेले. पंढरपूरहून नागपूरला जाताना दौंड स्टेशनावर आले. त्यावेळी त्यांना एका माणसाने फराळाचा डबा दिला. तो डबा गजाननमहाराजांनीच आणून दिला. अशी वरपांडे यांची खात्री पटली.
१६ एप्रिल, १९६३ रोजी अमरावतीला वराडपांडे यांच्या तीर्थरुपांना अकस्मात देवाज्ञा झाली, या घटनेचा सर्व भावांडावर फार परिणाम झाला, तो इतका की, सर्व भावांडं त्यांच कुलदैवत श्री व्यंकटेश आणि मोक्षगुरु श्रीगजाननमहाराज यांचा तिरस्कार करायला लागली. दर गुरुवारी श्रीगजाननमहाराज त्यांच्या स्वप्नात जायचे आणि म्हणायचे ‘आमच्यावरचा राग विसरा’ अखेर विजयादशमीच्या गुरुवारी महाराजांनी वराडपांडे यांच्याकडून स्वप्नात वचन घेतलं; मग महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचं वराडपांड्यांनी ठरवलं. ज्या मूर्तिकाराला त्यांनी मूर्ती करण्याचं काम दिलं होतं त्यानं चार महिन्यांनी उत्तर दिलं, मला तुमच्यासाठी मूर्ती तयार करण्याची प्रेरणाच होत नाही ! लगेच वराडपांडे यांनी शेगावच्या महाराजांच्या मूर्तीसमोर कळवळून प्रार्थना केली. इकडे महाराज त्या मूर्तीकाराच्या दुकानात साधूच्या रुपानं गेले, आणि ताबडतोप मूर्ती तयार करण्यास सांगितलं. मूर्ती झाली, प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर पुढल्या म्हणजे १९६६ सालच्या प्रकट दिनोत्सवात एकही पैशाची सोय नव्हती. उत्सवाच्या आदल्या दिवशी एक हातठेवलेला आला आणि बरंच सामान त्यानं वराडपांडे यांच्या मंदिरात आणून टाकलं. संध्याकाळी मी पैसे घेऊन जाईन असं सांगितलं. घरी आल्यावर वराडपांडे यांना हा प्रकार कळला. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं. कारण त्यांनी कुणालाच सामान आणायला सांगितलं नव्हतं. दासनवमीच्या रात्री त्यांच्या स्वप्नात समर्थ रामदासस्वामीच्या रुपात गजाननमहाराज येऊन म्हणाले, ‘कुणी आमच्यासाठी कार्य करत असेल, तर त्याच्यासाठी आम्हालाही कार्य करावं लागतं.

श्री गजानन महाराजांचा एक भक्त
चंद्रशेखर व्यं. वराडपांडे,
श्री गजानन महाराज मंदिर, रेशीमबाग, नागपूर-९.

3 thoughts on “भक्तांना आलेले अनुभव – चंद्रशेखर व्यं. वराडपांडे (श्री गजानन महाराज मंदिर, रेशीमबाग, नागपूर-९.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.